कोरोनाने चिंता वाढली, आता मुंबईत लॉकडाऊनची वेळ

Corona​ Variant Update : कोरोनाचा पुन्हा धोका वाढला आहे. मुंबईत एकाच दिवसात 1300 हून जास्त कोरोना केसेस आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. 

Updated: Dec 29, 2021, 11:22 AM IST
कोरोनाने चिंता वाढली, आता मुंबईत लॉकडाऊनची वेळ title=
संग्रहित छाया

मुंबई : Corona Variant Update : कोरोनाचा पुन्हा धोका वाढला आहे. मुंबईत एकाच दिवसात 1300 हून जास्त कोरोना केसेस आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. निर्बंध शिथिल असताना नागरिक निष्काळजीपणे वागताना दिसत होते. आता पुन्हा तेच निर्बंध, लॉकडाऊनची वेळ येऊ नये म्हणून आपणच काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र, सध्या नागरिकांना मास्कचाही विसर पडलाय आहे.

मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यात मुंबईत सील इमारतींची संख्या दोन दिवसांत दुप्पट झाली आहे. पाचहून अधिक कोविड बाधीत आढळले तर इमारत सील केली जाते. अंधेरी पश्चिम आणि ग्रँटरोड भागात सर्वाधिक इमारती सील झाल्या आहेत. 25 डिसेंबरपर्यंत 17 इमारती सील होत्या. तर आता ही संख्या 37 झाली आहे. दरम्यान, टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी ट्विट करून राज्यातल्या रूग्णवाढीच्या गांभीर्याकडे लक्ष वेधले आहे. पहिल्या लाटेत रुग्णवाढ डबलिंग होण्यात 12 दिवस लागले होते. तर दुसऱ्या लाटेत 20 दिवस लागले. मात्र, चिंतेची बाब म्हणजे तिसऱ्या लाटेत फक्त चारच दिवसात रुग्ण डबलिंग झाले आहे.

मुंबई पालिकेचा हा अ‍ॅक्शन प्लॅन 

मुंबई महापालिकेने लसीकरणाचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. आधारकार्ड नसेल तर कॉलेज, शाळेच्या ओळखपत्रावर लस मिळणार आहे. कॉलेज जवळील लसीकरण केंद्रावर 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण होणार आहे. लसीकरणावेळी डॉक्टर, रुग्णवाहिका तैनात ठेवणार आहे.

केंद्र सरकारने 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबईत 3 जानेवारीपासून लसीकरण मोहीमेला सुरुवात होणार असून मुंबईत 9 लाख 22 हजार 516 मुले आहेत.

वॉक इन लसीकरणावर भर दिला जाणार असला तरी कोविन अँपवर नोंदणी करणं गरजेचे आहे. प्रत्येक वॉर्डातील कॉलेजजवळ असलेल्या लसीकरण केंद्रावर लसीच्या मात्रा देण्यात येणार आहे. पालिका किंवा खासगी लसीकरण केंद्रावर या मुलांचे लसीकरण करण्यापेक्षा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये लसीकरण कॅम्प लावण्यात येणार आहे.
 
मुलांच्या लसीकरणावेळी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम सुरू करण्याआधी 1500 आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. लहान मुलांना कोव्हॅक्सिन लस द्यावी, असे केंद्र सरकराने निर्देश दिले आहेत. मुंबई महापालिकेकडे सध्या कोव्हॅक्सिन लसीचे 2 लाख 50 हजार डोस उपलबध आहेत. 9 लाख मुलांपैकी दिवसाला 30 हजार मुले आली तरी आठवडाभर पुरेल इतका लसीचा साठा आहे.