'आरेवरून शिवसेनेने धोका दिला, मेट्रो कारशेड उभारण्याचं षडयंत्र', संजय निरुपमांचा आरोप

आरे कॉलनीमधली मेट्रोची कारशेड महाविकासआघाडी सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Sep 3, 2020, 05:04 PM IST
'आरेवरून शिवसेनेने धोका दिला, मेट्रो कारशेड उभारण्याचं षडयंत्र', संजय निरुपमांचा आरोप title=

मुंबई : आरे कॉलनीमधली मेट्रोची कारशेड महाविकासआघाडी सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पण यावरुन काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. संजय निरुपम यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीका केली आहे. 

'सरकारने काल आरेमधली ६०० एकर भाग संरक्षित जंगल घोषित केला आहे, पण तिकडे प्रस्तावित मेट्रो कारशेडला वेगळं केलं आहे. हा शिवसेनेनं केलेला धोका आहे. आणि त्याच ठिकाणी कारशेडचं काम सुरू ठेवण्याचं एक षडयंत्र आहे. शहराच्या मध्ये जंगल आणि जंगलाच्या मधोमध मेट्रो स्टेशन, हे विकासाचं कोणतं मॉडेल आहे?', असा सवाल संजय निरुपम यांनी केला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत आरेमधली ६०० एकर जागा जंगल घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीआधी आरेमध्ये उभारण्यात येणाऱ्या मेट्रोच्या कारशेडवरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं होतं. शिवसेनेने आरे कॉलनीतल्या मेट्रोच्या कारशेडला विरोध केला होता. तसंच सत्तेत आल्यानंतर आरे कॉलनीतील मेट्रोची कारशेड रद्द करू, असं आश्वासन शिवसेनेने दिलं होतं. यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आरेमधल्या कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आली होती.