दीपक भातुसे / मुंबई : राज्यातील इंग्रजी, गुजराती, उर्दू अशा सर्व भाषिक शाळांमध्ये पहिली ते दहावी इयत्तेमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा ठराव विधानसभेनं करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.
मराठी विषय सक्तीचा केला नाही तर पुढल्या पिढीला मराठी वाचता येणार नाही, अशी भीती अजित पवार यांनी व्यक्त केली. आपल्या राज्यातील काही मंत्र्यांचे इंग्रजीत शिक्षण झालं आहे त्यांना मराठीत उत्तर देता येत नाही, त्यामळे ते सभागृहात उत्तर देणं टाळतात ही बाब अजित पवारांनी यावेळी निदर्शनास आणून दिली.
महाराष्ट्रात रहायचे आहे तर मराठी शिका, महाराष्ट्रात राहताना मराठी लिहता आणि वाचता यायला हवं. येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी चालू करावी. हे केलं तरच मराठी भाषा टिकेल, अन्यथा मराठी भाषा टिकणार नाही असे सांगत, पहिली ते दहावी इयत्तेपर्यंत मराठी सक्तीची करण्याचा ठराव करण्याची मागणी अजित पवारांनी केली.
कर्नाटकात सक्तीचं कन्नड शिक्षण घ्यावं लागतं, मग आपण मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने हा निर्णय घ्यायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही असा ठराव करावा अशी मागणी केली.
अजित पवारांच्या या मागणीला उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले की, आपल्या राज्यात आठवीपर्यंत मराठी अनिवार्य आहे. विधानसभेची ही भावना अभ्यास मंडळाला कळवली जाईल, त्यानंतर अभ्यास मंडळ याबाबत निर्णय घेईल.