मुंबई : देशात पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहेत. याचा फटका केवळ सर्वसामान्यांनाच नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेलादेखील बसतोय. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोलने 100 रूपयांचा आकडा पार केला. डिझेलच्या दरांत देखील सतत वाढ होत आहे. इंधनांच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे ग्राहकही त्रस्त झाले आहेत. शिवाय महिन्याचं गणित देखील बिघडलं आहे.
आता त्यामध्ये अधिक भर पडणार आहे. पेट्रोल-डिझेल आणि LPG सिलेंडरनंतर आता CNG आणि PNGच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
महानगर गॅस लिमिटेड या इंधन पुरवठादार कंपनीने बुधवारपासून मुंबईत सीएनजीच्या किमतीत प्रती किलो 2.58 रुपये आणि पाईप गॅसच्या दरात प्रती युनिट 55 पैसे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक आणि इतर खर्च वाढल्याने सीएनजीच्या किमती वाढवण्यात आल्याचे कारण महानगर गॅस लिमिटेडने दिलं आहे.
या दरवाढीनंतर मुंबईत सीएनजीचा भाव एक किलोसाठी 51.58 रुपये इतका असेल. तर पाईप गॅससाठी ग्राहकांना प्रती युनिट 55 पैसे अधिकचे मोजावे लागणार आहेत. त्यानुसार स्लॅब-1 साठी 30.40 रुपये प्रती युनिट आणि स्लॅब-2 साठी 36 रुपये प्रती युनिट दर असेल.
मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव 107.20 रुपये आहे तर डिझेलचा भाव 97.29 रुपये आहे.