उत्तर प्रदेशातील साधुंच्या हत्येनंतर मुख्यमंत्री ठाकरेंची आदित्यनाथ यांच्याशी चर्चा

अमानुष घटनेचे राजकारण करू नये – शिवसेनेचा भाजपवर निशाणा

Updated: Apr 28, 2020, 04:22 PM IST
उत्तर प्रदेशातील साधुंच्या हत्येनंतर मुख्यमंत्री ठाकरेंची आदित्यनाथ यांच्याशी चर्चा title=

उत्तर प्रदेशातील बुलंद शहरात दोन साधुंची हत्या झाल्यानंतर शिवसेनेने चिंता व्यक्त केली असून या अमानुष घटनेचे राजकारण करु नये, असे आवाहनही केले आहे. पालघरमधील साधुंच्या हत्येनंतर भाजपने महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला टीकेचे लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपवर पलटवार करण्याची संधी साधली आहे.

उत्तर प्रदेशातील बुलंद शहरात दोन साधुंची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर आरोपीला अटकही करण्यात आली आहे. या घटनेचा तीव्र निषेध सर्व स्तरांतून होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांधुंच्या हत्येबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून चर्चा केली.  दोन साधुंच्या हत्येबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. तसेच या अमानुष घटनेविरुद्ध आम्ही तुमच्या सोबत आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी आदित्यनाथ यांना सांगितले. आम्ही या घटनांमध्ये ज्या पद्धतीने कठोर कारवाई केली आहे, तशीच तुम्ही कराल अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याकडे व्यक्त केली. तसेच या घटनेला कुणीही धार्मिक रंग देऊ नये, असं आवाहनही ठाकरे यांनी केले आहे.

 

विशेष म्हणजे पालघरमध्ये जेव्हा साधुंची जमावाने निर्घृण हत्या केली होती, तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून घटनेबद्दल चिंता व्यक्त केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ठाकरे यांना फोन करून माहिती घेतली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना फोन करून साधुंच्या हत्येबाबत चिंता व्यक्त केली. तसेच अशा घटनांचे राजकारण करू नये असंही सांगत पालघरच्या घटनेवरून शिवसेनेला लक्ष्य करणाऱ्या भाजपला आपल्या पद्धतीने उत्तरच देण्याची संधी ठाकरे यांनी साधली.

 

दरम्यान, बुलंद शहरमधील साधुंच्या हत्येची बातमी सकाळी येताच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही या घटनेचा निर्घृण आणि अमानुष अशा शब्दांत धिक्कार केला होता. त्याचवेळी या घटनेचे पालघरप्रमाणे राजकाण करू नये, असं आवाहन केले होते. देश कोरोनाशी लढत आहे. शांतता राखा. योगी आदित्यनाथ हे गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील, असं राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

 

पालघरमध्ये साधुंची हत्या झाल्यानंतर भाजपने ठाकरे सरकारला लक्ष्य केले होते. उत्तर प्रदेशमधील साधुंच्या हत्येच्या निमित्तानं शिवसेनेने राजकारण न करण्याचा सल्ला देऊन भाजपवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही.