मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांना भेटण्याची शक्यता

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीची शक्यता

Updated: Feb 20, 2020, 04:39 PM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांना भेटण्याची शक्यता title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतील, असं समजतं आहे. राममंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याबद्दल पंतप्रधानांचं प्रत्यक्षात भेटून अभिनंदन करण्यासाठी ही भेट होणार असल्याची माहिती आहे. आज संध्याकाळपर्यंत दौऱ्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील ही शिष्टाचार भेट असल्याचं सांगण्यात येतंय. पंतप्रधान कार्यालय किंवा सीएमओ यांच्याकडून याबाबत असं कोणतंही अधिकृत घोषणा झालेली नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच भेट असेल. याआधी पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर गेले होते.

शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात पहिल्यांदाच चर्चा होणार आहे. २५ वर्षांची युती तुटली आणि राज्यात नवा पॅटर्न अस्तित्वात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत जात शिवसेनेने राज्यात सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे या भेटीकडे अनेकांचं लक्ष असेल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला तीन महिने पूर्ण होत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासह ते कोणाला भेटणार याबाबत ही आता चर्चा सुरु झाल्या आहेत.