जवानांच्या अपमानाचं प्रकरण, आदित्य ठाकरेंनी मानले झी २४ तासचे आभार

झी २४ तासच्या बातमीची दखल

Updated: Feb 20, 2020, 12:05 PM IST
जवानांच्या अपमानाचं प्रकरण, आदित्य ठाकरेंनी मानले झी २४ तासचे आभार title=

मुंबई : दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमा दरम्यान गोरखा रेजिमेंटच्या जवानांचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्र सदनातील अधिकारी विजय कायरकर यांची उचलबांगडी करण्यात आली. विजय कायरकर हे महाराष्ट्र सदनाचे सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) होते. त्यांनी आज शिवजयंतीच्या कार्यक्रमावेळी गोरखा रेजिमेंटच्या जवानांशी गैरवर्तन केले. झी २४ तासने ही बातमी दाखवल्यानंतर महाराष्ट्र सरकारने यावर लगेचच कारवाई केली. 

महाराष्ट्र सदनात बँडच्या माध्यमातून कार्यक्रमात हे जवान शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी आले होते. दुपारी जेवणाच्यावेळी हे जवान कँटीनमध्ये गेले असताना विजय कायरकर यांनी जवानांना जेवणाच्या ताटावरून बाहेर ढकलले. या प्रकारामुळे महाराष्ट्र सदनातील शिवजयंतीच्या कार्यक्रमाला गालबोट लागले होते. यावेळी शिवजयंती कार्यक्रमाच्या आयोजकांमधील काही जणांनी या प्रकाराला रोखण्याचा प्रयत्न केला. जवानांचा सन्मान योग्य पद्धतीने व्हायला हवा मात्र अधिकाऱ्यांकडून त्यांना धमकीची भाषा वापरण्यात आली. हा प्रकार धक्काबुक्कीपर्यंत गेला. त्यामुळे या प्रकारावर कारवाई व्हावी. हा प्रकार महाराष्ट्राच्या संस्कृतीत अजिबात रुचणारा नाही, असे आयोजकांनी म्हटले होते.

या पार्श्वभूमीवर राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत कायरकर यांच्यावर कारवाईचे आदेश दिले. गोरखा रेजिमेंटचे जवान कोणत्याही कार्यक्रमाला जात नाहीत. पहिल्यांदाच शिवजयंतीच्या निमित्ताने हे जवान महाराष्ट्र सदनात आले होते. या जवानांना कॅन्टीनमध्ये जेवणासाठी ताटं वाढून ठेवण्यात आली होती. मात्र, त्याचवेळी महाराष्ट्र प्रशासनाचे अधिकारी विजय कायरकर यांनी तुम्हाला येथे जेवता येणार नाही. तुमची व्यवस्था अन्य ठिकाणी केली आहे, असं सांगत त्यांना कॅन्टीनमधून अक्षरश: हाकलले. या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.