मुख्यमंत्र्यांची आज मराठा आरक्षण आंदोलनातील प्रमुखांशी बैठक

इतर राज्यांनी ५० टक्क्यांच्या पुढे दिलेल्या आरक्षणाला स्थगिती नसताना केवळ मराठा

Updated: Sep 11, 2020, 12:39 PM IST
मुख्यमंत्र्यांची आज मराठा आरक्षण आंदोलनातील प्रमुखांशी बैठक title=

मुंबई : मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीनंतर पुढील रणनिती ठरवण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलनातील प्रमुखांची बैठक बोलवली आहे. काल यासंदर्भात मुख्यमंत्र्यानी मंत्रीमंडळाच्या मराठा आरक्षण समितीबरोबर आणि कायदेतज्ज्ञांबरोबर बैठक घेतली होती. 

केंद्र सरकारने आणि इतर राज्यांनी ५० टक्क्यांच्या पुढे दिलेल्या आरक्षणाला स्थगिती नसताना केवळ मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्य सरकारने आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यामुळेच आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईबाबत आज मुख्यमंत्री मराठा आंदोलनातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर मराठा समाजामध्ये या मुद्यावरून असलेला रोष कमी करण्याचा प्रयत्नही या बैठकीच्या माध्यमातून होऊ शकतो. 

आरक्षणाच्या बाजूनं लढलेली वकील मंडळी, अभ्यासक आणि जाणकारांशी चर्चा करण्याचा निर्णय़ मंत्रिमंडळाच्या उपसमितीत घेण्यात आलाय. याबाबत दुपारी चार वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

सुप्रीम कोर्टाच्या अंतरिम आदेशावर चर्चा करण्यासाठी  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा निवास्थानी बैठक घेण्यात आली. यात पुढील रणनीती आणि उपलब्ध कायदेशीर पर्यायांवर चर्चा कऱण्यात आली. या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार उपस्थित होते.
 
बैल गेला आणि झोपा केला - विनायक मेटेंची टीका
बैल गेला आणि झोपा केला अशी गत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री यांची झालेली आहे. आता बैठक घेऊन काय उपयोग असा सवाल विनायक मेटे यांनी केला आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालायनं स्थगिती दिल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या बैठकांबाबत, मेटेंनी ही प्रतिक्रिया दिली.