'फावल्या वेळात क्राईम पेट्रोल पाहत...'; उद्धव ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

Abhishek Ghosalkar Firing Case : अभिषेक  घोसाळकरांच्या हत्येमागे तिसऱ्या व्यक्तीचा हात नाही ना असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आकाश नेटके | Updated: Feb 11, 2024, 08:40 AM IST
'फावल्या वेळात क्राईम पेट्रोल पाहत...'; उद्धव ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर title=

Abhishek Ghosalkar Firing Case : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने राजकारण तापलं आहे. गुरुवारी अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नावाच्या व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येनंतर रोज नवी माहिती समोर येत आहे. अशातच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी शंका उपस्थित केली होती. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एखाद्याच्या मृत्यूवर अशा पद्धतीने राजकारण करण हे मृत्यूपेक्षाही वेदनादायी आहे अस सांगत विरोधकांना टोला लगावला आहे.

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येवरुन उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सीआयडी, क्राईम पेट्रोल पाहून उद्धव ठाकरेंमध्ये जासूस करमचंद अवतरला आहे असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. घोसाळकर हत्येप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. घोसाळकरांच्या हत्येमागे तिसऱ्या व्यक्तीचा हात नाही ना अशी शंका उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्यावरुन एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

"घोसाळकर प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे. कारण एका तरुण होतकरी मुलाचा मृत्यू झाला. झालेला प्रकार दुर्दैवी असून त्याहीपेक्षा त्याचे राजकारण करणे अतिशय दुर्दैवी आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिलेली व्यक्ती त्यांनी अशा प्रकारचे भाष्य करणे. पोलीस तपास सुरु आहे. फेसबुक लाईव्ह सुरु होतं. सत्य बाहेर येणार आहे याची आपल्याला कल्पना येणार आहे. आमचं गृह विभाग आणि गृहमंत्री यासाठी समर्थ आहेत. प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष आहे. मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारच्या घटनेचं राजकारण करणे हे अतिशय वाईट आहे. अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात गेलेले मुख्यमंत्री फावल्या वेळात सीआयडी, क्राईम पेट्रोल पाहत असतील. जासूस करमचंद त्यांच्यातून अवतरला असेल असे मला वाटतं. राजकारण करायला खूप वाव आहे. पण आपल्याच्या एका सहकाऱ्याच्या मुलाच्या मृत्यूचे राजकारण हे फार वाईट आहे," असे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

"गोळ्या झाडताना दिसत आहे पण कोणी झाडल्या ते दिसत नाही. मॉरिसकडे परवानाधारक शस्त्र नव्हते. त्याने बॉडीगार्डच्या शस्त्रातून गोळ्या चालवल्या. त्या गोळ्या मॉरिसने चालवल्या की आणखी कोणी चालवल्या? दोघांना मारण्याची सुपारी कोणी दिली होती का हा प्रश्न आहे. आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही. कारण आधीचे राज्यपाल कर्तव्यदक्ष होते आणि त्यांच्यासोबत गुंडांचा फोटो होता. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचं प्रकरण वरकरणी दिसतं, तेवढं सोप नाही. ज्या गुडांने हत्या केली, त्याने आत्महत्या का केली? हा प्रश्न निर्माण होतो. मॉरिसने फेसबुक लाईव्ह केले, त्यामध्ये गोळ्या झाडलेल्या दिसत आहेत. पण त्या कुणी झाडल्या? हे दिसत नाही. या गोळ्या मॉरिसनेच झाडल्या की दुसऱ्या कुणी झाडल्या हा प्रश्न निर्माण होतो. मॉरिसने आत्महत्या केल्याचे फुटेज आहे का?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला होता.

राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला - उद्धव ठाकरे

"राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर बोलण्यासाठी आणि गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी माझ्यासाठी शब्द नाहीत. याआधी मी त्यांना उद्देशून फडतूस शब्द वापरला होता. पण आता तोही तोकडा पडतोय. या महाराष्ट्राला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे का? असा प्रश्न मला पडला आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले.