'सबका साथ आणि मित्र का विकास...', उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला

"एकदा जर तुम्ही मिठागरात गेलात तर तुम्हाला पुन्हा धारावी दिसणार नाही. कारण ही जागा अदानीच्या घशात घातली जाईल", असे उद्धव ठाकरे म्हणाले

Updated: Feb 10, 2024, 08:52 PM IST
'सबका साथ आणि मित्र का विकास...', उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला title=

मुंबई : सध्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. अनेक राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यात गेल्या काही आठवड्यांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रिंगणात उतरले आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी धारावीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. "धारावीकरांना उचलून मिठागरात टाकायचं आणि इकडे उपऱ्यांची वस्ती बसवून सगळा पैसा अदानीच्या खिशात घालणार असाल, तर माझ्या धारावीकरांनी काय पाप केलंय", असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. 

"गेल्या काही दिवसांपूर्वी आपण एक मोठा मोर्चा काढला होता. आपण सर्वजण त्याला निश्चित उपस्थित असाल. तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की मराठी आणि हिंदीत बोला. पंचायत अशी होते की मराठीत बोलायला सुरुवात केली की सलग मराठीत बोलणं होतं. आज थोडं हिंदी आणि थोडं मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतो. मी ठिकठिकाणच्या शाखांना भेट देतोय. काही दिवसांपूर्वी मी उल्हासनगरच्या शाखेला भेट दिली होती. आज धारावीतील शाखेला भेट द्यायला आलो आहे. सध्या या सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला आहे आणि हा असंतोष धारावीत जरा जास्तच आहे, असे मला तरी वाटते. मी तुमच्यासाठी लढायला उतरलो आहे", असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

"संपूर्ण मुंबई अदानीच्या खिशात घालायला निघाले"

"हल्लीच त्यांनी सरकारच्या जेवढ्या यंत्रणा आहेत यात ईडी, सीबीआय, काही रिटार्यड पोलीस ऑफिसरला देखील कामाला लावलं आहे. गुंडागर्दी वाढली आहे. विकाऊ माल विकला गेला. पण माझे निष्ठावंत मावळे जोपर्यंत माझ्यासोबत आहेत, तोपर्यंत मला लढण्याची किंवा जिंकण्याची अजिबात चिंता नाही. माझ्या धारावीकरांना 500 फूटांचं हक्काचं घरं मिळालं पाहिजे म्हणजे मिळालंच पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे. विकास आम्हालाही हवा आहे. धारावी कशी होती आणि आता कशी आहे, आता धारावीला सोन्याची किंमत आली आहे. मुंबईतील उद्योगधंदे घेऊन गेले आता ते कमी पडतंय म्हणून धारावीच्या विकासाबरोबर संपूर्ण मुंबई अदानीच्या खिशात घालायला निघाले आहेत", असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. 

"धारावीकरांना उचलून मिठागरात टाकायचं आणि इकडे उपऱ्यांची वस्ती बसवून सगळा पैसा अदानीच्या खिशात घालणार असाल, तर माझ्या धारावीकरांनी काय पाप केलंय? मी मुख्यमंत्री म्हणून माझ्या मुंबईकरांसाठी कांजूरमार्गची जागा मागत होतो. तेव्हा दिली नाही. पण आता पंतप्रधानांचे मित्र अदानीसाठी मुलुंडची, मिठागरांची जागा देऊन टाकली. 'सबका साथ आणि मित्र का विकास' हे आम्ही होऊ देणार नाही. माझे धारावीकर इथून कुठेही जाणार नाहीत. माझ्या धारावीकरांना विकास हवा, तोही ही इथल्या इथेच हवा. एकदा जर तुम्ही मिठागरात गेलात तर तुम्हाला पुन्हा धारावी दिसणार नाही. कारण ही जागा अदानीच्या घशात घातली जाईल. धारावीत तुम्ही पिढ्यांपिढ्या राहत आहात. कोव्हिड आला होता तेव्हा पंतप्रधान, उपमुख्यमंत्री कधी धारावीत आले होते का, पण आता दिसतील कारण आता करोना नाही", असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

"धारावीकरांनो फक्त ठाम उभे राहा"

"महाराष्ट्रात गुंडागर्दी वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्र बदनाम झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंदे येणारचं नाही, हे या नालायक राज्यकर्त्यांना कळत नाही. महाराष्ट्राची बदनामी करायची, जेणेकरुन महाराष्ट्रात कोणी येऊ नये. मुंबईचीही अशी वाट लावायची की तिला पार भिकेला लावून टाकायचे, हे बघून जीव जळतोय, म्हणून मी लढायला उभा आहे. त्यांच्यालेखी जनता ही कुत्र्या-मांजरासारखी असेल, तर निवडणुकीच्यावेळी मत मागायला आल्यावर जनतेला त्यांच्या पेकाटात लाथ घालावीच लागेल. निवडणूक तोंडावर आली आहे. तुम्हाला आता तुमचा आवाज उठवणारा नेता हवा की यांचे तळवे चाटणारा हे आता तुम्ही ठरवायचं आहे. तुम्ही नेहमी म्हणता उद्धव साहेब आगे बडो, हम तुम्हारे साथ है, पण आता मी असं म्हणतो की धारावीकरांनो फक्त ठाम उभे राहा, अख्खी शिवसेना तुमच्या पाठिशी उभी आहे", असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.