वनगांच्या बाबतीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना असं चकवलं...

स्वर्गीय चिंतामण वनगा भाजपचे वरिष्ठ नेते होते. पक्ष वाढीत मोठा वाटा होता.

Updated: May 5, 2018, 08:34 PM IST

मुंबई : स्थानिक राजकारण असावं तुमचा कुणी विचार करीत नाही असा वनगा कुटुंबीयांना समज करून दिला असावा अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. तसंच वनगा यांची पुण्याई मोठी आहे. भाजपला नुकसान होईल असं वनगा कुटुंबीय वागणार नाहीत अशी आशा आहे असंही ते म्हाणाले.

'मला वाटतं वनगा कुटुंबीयांचा गैरसमज झाला असावा. स्वर्गीय चिंतामण वनगा भाजपचे वरिष्ठ नेते होते. पक्ष वाढीत मोठा वाटा होता. पक्ष वाढीसाठी मोठा संघर्ष केला. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती आहेच. या निवडणुकीत त्यांच्या कुटुंबीयांनाच तिकीट देण्याचा विचार सुरू होता. स्वतः २७ किंवा २८ तारखेला उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो होतो. अशा परिस्थितीत पोटनिवडणूक लढत नाही, अशी उद्धव यांनी भूमिका मांडली होती. मी त्यांना मदत करा, असं आवाहन केलं होतं. त्यांनी सुभाष देसाई तुमच्याशी चर्चा करतील, असंही सांगितलं होतं. त्यानंतर अचानक वनगा कुटुंबियांना प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून टीव्हीवर पाहिलं. स्थानिक पातळीवर पक्षाचे नेते वनगा कुटुंबियांच्या संपर्कात होते, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय. 

वनगा कुटुंबीयांनी धरली 'मातोश्री'ची वाट

गुरुवारी, दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या कुटुंबीयांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. भाजपाने दुर्लक्ष केल्याने त्यांनी मातोश्रीची वाट धरल्याचं सांगितलं. त्यामुळे, पालघर पोटनिवडणुकीत राजकीय रंग बदलले असल्याचं दिसून येत आहे. खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणुकीसंदर्भात वनगा कुटुंबीयांनी 'भाजपनंच आपल्यावर 'मातोश्री' गाठण्याची वेळ आणल्याचं' म्हटलंय. भाजप आणि चिंतामण वनगा यांचं नातं अतूट होतं. परंतु, आज त्यांच्या कुटुंबीयांनी अश्रुभरल्या डोळ्यांनी आपल्या पक्षानं आपल्याला वाऱ्यावर सोडल्याचं सांगितलंय. पालघर पोटनिवडणुकीत भाजपनं वनगा यांच्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष केल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची फोनवरून आणि एसएमएसवरून भेट मागितली पण त्यांनी काही वेळ दिली नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं.