मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इमारत दुर्घटनाग्रस्त ठिकाणी भेट देऊन केली पाहणी

म्हाडाच्या धोकादायक इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरु असताना इमारतीचा एक भाग कोसळला.  

Updated: Jul 17, 2020, 09:06 AM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इमारत दुर्घटनाग्रस्त ठिकाणी भेट देऊन केली पाहणी  title=

मुंबई : म्हाडाच्या धोकादायक इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरु असताना इमारतीचा एक भाग कोसळला. फोर्ट येथील धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केले. त्यांनी फोर्ट परिसरातील या दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ठिकाणी भेट देऊन चालू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला आणि दुर्घटनेच्या स्थळाची पाहणी केली.

फोर्ट येथे इमारत दुसरुस्तीची काम सुरु असतानाच इमारतीचा काही भाग कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांपैकी २३ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.

फोर्ट येथील मिंट रोडवरील असलेल्या भानुशाली या उपकरप्राप्त म्हाडाच्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक आणि पोस्ट ऑफिस मुख्यालयासमोर ही सहा मजली इमारत आहे. इमारत धोकादायक झाल्याने दुरुस्तीचे काम सुरु होते. 

या धोकादायक इमारतीमधील काही कुटुंब दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आली होती. मात्र, काही कुटुंब येथे राहत होती. इमारतीच्या उत्तरेकडील काही  भाग कोसळला. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला. जखमींना जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाकडून बचाव आणि मदक कार्य सुरुच आहे.