Cheque Drop Box | ड्राफ्ट बॉक्समधले तुमचे चेक असुरक्षित

अनेक बँकामध्ये चेक जमा करण्यासाठी ड्रॉप बॉक्स (cheque drop box) असतात. खातेदार याच बॉक्समध्ये निर्धास्तपणे आपला चेक टाकतात.

Updated: Feb 14, 2022, 10:21 PM IST
Cheque Drop Box | ड्राफ्ट बॉक्समधले तुमचे चेक असुरक्षित title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : तुम्ही आम्ही बॅंकेतील ड्रॉप बॉक्समध्ये (Cheque Drop Box) चेक टाकतो. मात्र या चेकवर डल्ला मारत काही भामट्यांनी हे पैसे परस्पर लाटल्याचा धक्कादायक प्रकार मुंबानगरी म्हणजेच मुंबईतून समोर आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता चेक ड्रॉप बॉक्सचा वापरही सुरक्षित नसल्याची प्रतिक्रिया सर्वसामांन्यामधून उमटत आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून या टोळीच्या म्होरक्याला अटक केली आहे. (cheque drop box are unsafe for account payee cheque in mumbai)

अनेक बँकामध्ये चेक जमा करण्यासाठी ड्रॉप बॉक्स असतात. खातेदार याच बॉक्समध्ये निर्धास्तपणे आपला चेक टाकतात. या ड्रॉप बॉक्सला लॉक नसतो. याचाच गैरफायदा या भामट्यांनी घेतला. 

या भामट्यांनी ड्रॉप बॉक्समधून तब्बल 35 लाख रुपयांचे चेक 'वटवले'. त्यानंतर चेकसोबत असलेल्या आरटीजीएस अर्जात अफरातफर केली. त्यामध्ये या भामट्यांनी स्वत:चा बँक अकाऊंट नंबर टाकला. अशाप्रकारे या म्होरक्यांनी गैरफायदा घेतला. 

हा असा सर्व प्रकार घडल्याचं संबंधित बँकेला लक्षात आलं. त्यानुसार ज्या कंपनीच्या बँक अकाऊंटमध्ये हा सर्व प्रकार घडला, त्या कंपनीने पोलिसांमध्ये  तक्रार दाखल केली. त्यानुसार साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी केली असता, या टोळीचा म्होरक्या सापडला. या म्होरक्याला न्यायालयाकडून 15 फेब्रुवारीपर्यंत  पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी आणखी तपास सुरु आहे. या तपासातून आणखी काही आरोपी जाळ्यात अडकचीस अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान चेक ड्रॉप बॉक्सचा वापर करताना त्याला लॉक आहे की नाही, हे पाहूनच व्यवहार करावा, असं आवाहन करण्यात येत आहे.