मुंबई: तब्बल नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर मोठा गाजावाजा करत पुन्हा सुरु करण्यात आलेली मोनरेल्वे सेवा रविवारी दुपारी पुन्हा एकदा ठप्प झाली. चेंबुर नाक्याजवळ हा प्रकार घडला. याठिकाणी असलेली इंटरनेटची वायर अडकल्यामुळे मोनोरेल्वे बंद पडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वेमधील प्रवासी गाडीतच अडकून पडले आहेत. त्यांना सुखरुपपणे खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
दरम्यान, तांत्रिक बिघाड दुरुस्त होऊन मोनोरेल्वे पूर्ववत धावण्यासाठी किती वेळ लागेल, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. काही महिन्यांपूर्वी आग लागल्यामुळे मोनोची वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात देखभाल आणि सुरक्षेच्या सर्व उपाययोजना अंमलात आणून मोनो शुक्रवारी सकाळपासून पुन्हा रुळावर धावायला लागली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी एका केबलमुळे मोनोची वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे. त्यामुळे भविष्यात मोनोची वाहतूक पुन्हा सुरु करणे, कितपत व्यवहार्य ठरेल, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.