चंद्रकांत पाटलांच्या कोथरूडमधील उमेदवारीमुळे ब्राह्मण विरुद्ध मराठा संघर्ष पेटण्याची शक्यता

हा वाद आणखीन चिघळल्यास निवडणुकीत भाजपला याचा मोठा फटका बसू शकतो.

Updated: Sep 30, 2019, 07:21 PM IST
चंद्रकांत पाटलांच्या कोथरूडमधील उमेदवारीमुळे ब्राह्मण विरुद्ध मराठा संघर्ष पेटण्याची शक्यता title=

पुणे: चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी देण्यावरून आता मराठा विरुद्ध ब्राह्मण वाद पेटण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील यांना अचानकपणे पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. हा मतदारसंघ भाजपच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा आहे. त्यामुळे ब्राह्मण महासंघाने चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूडमधील उमेदवारीला विरोध दर्शविला होता. 

ब्राह्मण महासंघाच्या या भूमिकेनंतर मराठा क्रांती मोर्चा प्रचंड आक्रमक झाला आहे. भाजप महाराष्ट्रात जिथे जिथे ब्राह्मण उमेदवार उभे करेल त्याठिकाणी आम्ही आमचा उमेदवार उभा करू, असे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. हा वाद आणखीन चिघळल्यास निवडणुकीत भाजपला याचा मोठा फटका बसू शकतो. 

यावर ब्राह्मण महासंघानेही भाजपवर टीका केली आहे. भाजप राज्यात मराठा विरुद्ध ब्राह्मण, मराठा विरुद्ध धनगर असा वाद निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

दरम्यान, मेधा कुलकर्णी यांनी सोमवारी चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी करू. माझ्या मतदारसंघात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष उभे राहतात, ही माझ्यासाठी यशाची पोचपावती असल्याची प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनीही अशाप्रकारचे वाद हा प्रक्रियेचा एक भाग असल्याचे म्हटले. मात्र, चर्चेअंती ९० टक्के प्रश्न सुटतात. पक्ष हा कोणाचा नसतो. संघटना देते ती जबाबदारी पार पाडायची असते. पक्षाने मला सांगितल्यामुळे कोथरूडमधून निवडणूक लढवावी लागत आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.