विशाखापट्टणम एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिवसाच्या सुरुवातीपासूनच मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

Updated: Sep 15, 2019, 07:11 AM IST
विशाखापट्टणम एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत title=

मुंबई: तांत्रिक बिघाड पाचवीला पुजलेल्या मध्य रेल्वेची वाहतूक रविवारी सकाळी पुन्हा एकदा विस्कळीत झाली. मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकाजवळ विशाखापट्टणम एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाला आहे. त्यामुळे ही एक्स्प्रेस याठिकाणी अडकून पडली आहे. परिणामी या मार्गावरील लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या मध्य रेल्वेवरील गाड्या जवळपास २० मिनिटे उशिराने धावत आहेत. 

दरम्यान, आज मेगाब्लॉक असल्यामुळे या गोंधळात आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिवसाच्या सुरुवातीपासूनच मनस्ताप सहन करावा लागू शकतो. 

याशिवाय, काल रात्रीपासून मुंबई उपनगरासह कल्याण आणि डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पावसाचा जोर असाच राहिल्यास मध्य रेल्वेसमोर आणखी अडचणी उभ्या राहण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये पाऊस आणि तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे सातत्याने ठप्प होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे प्रवाशांना रात्रभर रेल्वे स्थानकांवर अडकून पडावे लागले. याविरोधात छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर (सीएसएमटी) संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तरांच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली होती.