दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : महाविकासआघाडीचा खातेवाटप आणि पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अंतिम निर्णयानंतर आज दुपारनंतर खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. गुरुवारी दीर्घ काळ चाललेल्या चर्चेनंतर शिवसेनेच्या कोट्यातून काँग्रेसला सांस्कृतिक कार्य, बंदरे आणि खार भूमी विकास तर राष्ट्रवादी काँग्रेसला युवक कल्याण आणि क्रीडा ही खाती देण्यात येणार आहे.
तर ज्या पक्षाचे आमदार जास्त असतील त्यांना त्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार आहे. त्यानुसार १३ जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद शिवसेनेकडे, राष्ट्रवादीकडे १२ तर काँग्रेसकडे ११ जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद असणार आहेत. पालकमंत्रिपदासाठी तीन ते चार जिल्ह्यावर तीनही पक्षांनी दावा ठोकलाय, त्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घ्यावा असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादीला आणखी एक जादा खातं हवं, मात्र त्याबाबत सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, आता चर्चा होणार नाही, अशी तीनही पक्षांनी भूमिका घेतली आहे. प्रमुख महाविकासआघाडीच्या तिन्ही पक्षातील मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी तयार असून, दुपारनंतर दोन्ही पक्ष मुख्यमंत्र्यांकडे यादी सादर करणार आहेत. त्यानतंर मुख्यमंत्र्यांच्या अंतिम निर्णयानंतर खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.
खातेवाटपाची अधिकृत घोषणा होणार असली तरी खातेवाटप झाल्यात जमा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांना अर्थ व नियोजन खातं देण्यात येणार असून जयंत पाटलांना जलसंपदा खातं देण्यात येणार आहे.
काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांना महसूल खातं देण्यात आलं आहे. तर अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खातं देण्यात आलंय. काँग्रेस काही ग्रामीण भागांशी संबंधित खात्यांवर आग्रही असली तरी ही मागणी शिवसेना-राष्ट्रवादीनं धुडकावून लावल्याचं चित्र आहे.