सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण आता शपथविधी होऊन 11 दिवस झाले तरी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजूनही चर्चाच सुरु आहे.
राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत पण इतर खात्यांचे मंत्रीच नाही अशी सध्याची स्थिती आहे. यामुळे भाजपातील आणि एकनाथ शिंदे समर्थ गटातील इच्छुक मात्र चांगलेत चिंताग्रस्त आहेत. नेमका मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आणि कुणाची वर्णी लागणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले आठवडाभर महत्वाच्या बैठका घेत आहेत. राज्यातील पूर परिस्थितींचा या बैठकीत आढावा घेतला जात आहे. आज तर थेट गडचिरोलीला जात पूर परिस्थितीची पाहणी केली. मात्र राज्यातील इतर खात्यांचे मंत्री कोण आणि त्यांचा कार्यभार काय असणार याबाबत सध्यातरी अनिश्चितता आहे.
मंत्रालयात देखील याबाबत तर्क वितर्क आणि चर्चा रंगली आहे. कोणतं खातं कोणत्या गटाला मिळणार भाजपाकडे कोणती खाती येणार तर एकनाथ शिंदे गटांकडे कोणती खाती येणार, कोणत्या नेत्याला कोणत्या मंत्रिपदाची लॉटरी लागणार? मंत्रिमंडळ विस्तार होताना कोणाचा पत्ता कापला जाणार? याची सध्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी...
शिंदे फडवणी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार या आठवड्यात तरी होणार का याविषयी देखील शंका व्यक्त केली जात आहे. याआधी आषाडीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा सुरू होती. आता भाजपातील एका वरिष्ठ नेत्यांनीच झी24तासला माहिती दिली आहे की राष्ट्रपती निवडणूक 18 जुलै रोजी आहे त्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.
राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्यावरून एक मतप्रवाह असा देखील आहे की 14 तारखेला एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू मुंबई दौऱ्यावर आहे. त्यानंतर लगेच शपथविधी होऊ शकतो. काहींच्या मते 13 जुलैला गुरु पौर्णिमा आहे या दिवशी देखील शपथविधी होण्याची शक्यता आहे.
तूर्तास मात्र तारखांची चर्चा फक्त रंगली आहे. पण विस्तार नेमका कधी होणार हे कोणी सांगू शकत नाही. यामुळेच अनेक राजकीय नेते अस्वस्थ आहेत ज्या नेत्यांना मंत्री होण्याची आस लागली आहे ते देखील अस्वस्थ आहे.