Kangana Ranaut : ठाकरेंना आव्हान देणारी कंगना शिंदेंना भेटणार

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि कंगनाचं (Kangana Ranaut) वैर अख्ख्या जगाला माहितीय. पालघर साधू हत्याकांडानंतर ठाकरेंचा एकेरी उल्लेख कंगनानं केला होता.    

Updated: Sep 30, 2022, 11:33 PM IST
Kangana Ranaut : ठाकरेंना आव्हान देणारी कंगना शिंदेंना भेटणार title=

रुचा वझे-कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी हाडवैरी अशी ओळख असणारी कंगना रानावत (Kangana Ranaut) आता एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) भेट घेणार आहे. ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी कंगना शिंदेंच्या भेटीला येत असल्याची चर्चा आहे. (bollywood actress kangana ranaut will meet maharashtra chief minister eknath shinde)

उद्धव ठाकरे आणि कंगनाचं वैर अख्ख्या जगाला माहितीय. पालघर साधू हत्याकांडानंतर ठाकरेंचा एकेरी उल्लेख कंगनानं केला होता. मुंबईची तुलना अप्रत्यक्षपणे POKशी केली होती. त्यानंतर कंगनाचं मुंबईतला बंगला अनधिकृत आहे असं अचानक मुंबई महापालिकेला लक्षात आलं आणि तिच्या बंगल्याच्या अनधिकृत भागावर बुलडोझर चालवण्यात आला. 

मग कंगनानं ठाकरेंना चॅलेंज दिलं, आज माझं घर तुटलंय उद्या तुमचा अहंकार तुटेल असं कंगना म्हणाली होती. त्यानंतर कंगना-ठाकरे वादाला काही काळासाठी पूर्णविराम मिळाला होता. पण आता हा वाद परत उफाळून येऊ शकतो कारण कंगना रानावत एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे. शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी कंगना-शिंदे भेट होणार आहे. कंगना रनौतचे कौटुंबिक स्नेही मनीष धुरी आणि कुशल धुरी यांच्या माध्यमातून ही भेट होतेय. कंगना-शिंदे भेटीआधीच ठाकरेसेनेनं यावर टीका केलीय.

कंगना-ठाकरे वाद हा राजकीय राहिला नव्हता, तो व्यक्तिगत पातळीपर्यंत पोहचला होता. कंगनाला मुंबईत पाऊल ठेवू देणार नाही असा इशारादेण्यापर्यंत हा वाद चिघळला होता. पण आता शिंदे-ठाकरे वेगळे झालेत, शिंदेंमुळे ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. त्यामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायानंच कंगना मुख्यमंत्री शिंदेंना भेटणार आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत कंगना ठाकरेंविरोधात शिंदे गटासाठी प्रचाराच्या मैदानात उतरणार का याची उत्सुकता लागलीय.