अकेला फडणवीस, बाकीचे कासावीस! गोव्यात भाजपची दमदार कामगिरी

BJP victory in Goa | Devendra Fadnavis | गोव्यातील भाजपच्या यशाचं महाराष्ट्र कनेक्शन आहे ते देवेंद्र फडणवीसांमुळे! अशक्य वाटत असलेला विजय त्यांनी खेचून आणलाय. फडणवीसांच्या या करिष्म्यामुळे पक्षात त्यांचं वजन वाढणार आहे आणि महाविकास आघाडीवर त्यांचा हल्ला अधिक तिखट होणार आहे. 

Updated: Mar 11, 2022, 10:05 AM IST
अकेला फडणवीस, बाकीचे कासावीस! गोव्यात भाजपची दमदार कामगिरी title=

सागर कुलकर्णी,  मुंबई : गोव्यातील भाजपच्या यशाचं महाराष्ट्र कनेक्शन आहे ते देवेंद्र फडणवीसांमुळे! अशक्य वाटत असलेला विजय त्यांनी खेचून आणलाय. फडणवीसांच्या या करिष्म्यामुळे पक्षात त्यांचं वजन वाढणार आहे आणि महाविकास आघाडीवर त्यांचा हल्ला अधिक तिखट होणार आहे. 

देवेंद्र फडणवीसांचं राजकीय 'वजन' वाढलं

'अकेला देवेंद्र क्या करेगा' असं विचारणा-या महाविकास आघाडीच्या नेत्यांना फडणवीसांनी आपल्या कृतीतून उत्तर दिलंय. गोव्याचे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासून भाजपचीच सत्ता येणार, असं फडणवीस सांगत होते. गोव्याच्या या यशात फडणवीसांचा मोठा वाटा आहे. बुथ स्तरावर संघटनात्मक रचना लावण्यापासून ते उमेदवार निवडीपर्यंत, गोव्यात दिसला तो फडणवीस इफेक्टच... 

2017ला केवळ 13 जागा निवडून आल्या असताना नितीन गडकरी पणजीत धावले आणि काँग्रेसच्या नाकाखालून सत्ता हिसकावून घेतली. मात्र मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांच्याकडे नेतृत्तव आलं खरं. मात्र त्यांची सरकारवर पकड नसल्याचं चित्र होतं. त्यामुळे भाजपचा पराभव नक्की मानला जात होता. मात्र फडणवीस गोव्यात गेले आणि सारं चित्र पालटलं. प्रस्थापितविरोधी लाटेचा फटका बसणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली. अनेक ठिकाणी उमेदवार बदलले. पर्रिकरांचे पुत्र उत्पल यांची नाराजी सहन करून आपल्या निर्णयावर ठाम राहिले. 

मंगळवारी स्टिंग ऑपरेशन पेन ड्राईव्ह प्रकरण, बुधवारी मलिकांच्या राजीनाम्यासाठी काढलेला मोर्चा आणि गुरूवारी गोव्यातील विजयामुळे... फडणवीसांनी एक आगळी हॅटट्रिक केलीये. मात्र फडणवीसांचा झंझावात आता कुठे सुरू झालाय, असंच म्हणता येईल.

फडणवीस गोव्याला जाताना महाविकास आघाडीच्या खुर्चीखाली सुरूंग पेरून गेले होते. आता ते राज्यात परततील ते नवी उर्जा घेऊन आणि दिल्लीचं अधिक पाठबळ घेऊन. आता व्हिडिओ बॉम्बमुळे बेजार झालेल्या महाविकास आघाडीला आता राजकीय वजन वाढलेल्या फडणवीसांचा सामना करणं अधिक अवघड होणार हे नक्की.