मुंबई : कोरोना काळातील संकटातून सावरत असताना राज्यातील जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प आज वित्त मंत्री अजित पवार मांडणार का याकडे लक्ष आहे. नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवरी उत्पादन शुल्क कमी केलं. त्याला आता तीन महिने उलटले, तरी राज्य सरकारनं इंधनावरील कर कमी करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.
आजच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं अजित पवारांकडे जनतेला दिलासा देण्याची नामी संधी चालून आली आहे. काल विधीमंडळात सादर झालेल्या राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार पुढील वर्षी राज्याच्या विकासाचा दर सुमारे 12 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे अर्थात राज्याच्या एकूण उत्पन्नात कोव्हिड काळाच्या तुलनेत घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नातील ही वाढ वापरुन इंधनावरील कर कमी करुन अजित पवार जनतेला दिलासा देतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दुपारी दोन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत तर अर्थ राज्य मंत्री शंभुराजे देसाई विधान परिषदेत अर्थ संकल्प सादर करतील.