कंगनाचे समर्थन करणाऱ्या भाजपचा 'यू टर्न'

अभिनेत्री कंगना राणौतबाबत भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्यापासून भाजपने हात झटकलेत.  

Updated: Sep 4, 2020, 02:52 PM IST
कंगनाचे समर्थन करणाऱ्या भाजपचा 'यू टर्न'   title=

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौतबाबत भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्यापासून भाजपने हात झटकलेत. कंगनाचे समर्थन करणाऱ्या भाजपने यू टर्न घेतला आहे. पत्रकार परिषद घेऊन आमदार आशिष शेलार यांना सारवासारव करावी लागली. राम कदम यांनी झाशीच्या राणीशी कंगना राणौतची तुलना केली होती. मात्र अखेर भाजपला या प्रकरणातून हात झटकावे लागले. कंगना राणौत हिने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही, असे शेलार यांनी म्हटले आहे. 

सुशांतसिंह प्रकरणात वेगवेगळी वक्तव्ये करत प्रकरण संभ्रमीत करण्याचा प्रयत्न काही लोकं करत आहेत. कंगना यांनी मुंबई किंवा महाराष्ट्रबद्दल कोणतेही व्यक्तव्य करत शिकवण्याचा प्रयत्न करू नये. याबद्दल सहमत असण्याचा प्रश्नच येत नाही. कंगना यांच्या मागे राहून वार करण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी करू नये. राम कदम यांच्या झाशीची राणी या कंगनाबद्दलच्या वक्तव्याबद्दल, ज्यांनी आपले व्यक्तीगत मत व्यक्त केले आहे, त्यावर ते खुलासा करतील, सर्व नागरिकांना सन्मानाने बघितलं पाहिजे. सन्मानाची भूमिका प्रत्येक व्यक्तीला बघण्याची असली पाहिजे. ही त्यांची भूमिका आहे त्याच्यात काही चुकीचे नाही, असे आशिष शेलार म्हणाले.

दरम्यान, काही तासांपूर्वीच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. आपण पोकळ धमक्या देत नाही, म्हणत कंगनाचे नाव न घेता जोरदार समाचार घेतला. त्यानंतर भाजपनेही मुंबईप्रश्नी विधानावर सावरासावर केली आहे. अभिनेत्री कंगना रणौतने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप केला आहे. मुंबईत पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी परिस्थिती झाली असल्याचे म्हटले आहे. कंगनाच्या आरोपांवर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आपण पोकळ धमक्या देत नाही. मी शिवसैनिक असून अ‍ॅक्शनवाला माणूस आहे.

मी कोणाचंही नाव घेणार नाही. पण जर कोणी म्हणत असेल मी धमकी दिली तर मी पोकळ धमकी देत नाही, ते काम माझे नाही, असली नौटंकी मी करत नाही. मी शिवसैनिक असून अ‍ॅक्शनवाला माणूस आहे. तेव्हा या ज्या मेंटल केसेस वाढल्या आहेत, त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. त्यानंतर भाजपने आपली भूमिका बदली आहे. कंगनाला दिलेल्या पाठिंब्यावरुन यू-टर्न घेतला.

राम कदम काय म्हणाले होते?

राम कदम यांनी गुरुवारी ट्विट करून म्हटले की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात शिवसेनेतील एका बड्या नेत्याने पुन्हा एकदा कंगना राणौतला धमकावण्याचे दु:साहस केले आहे. कंगना राणौतने मुंबईत येऊ नये, असे शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटले. मात्र, कंगना राणौत मुंबईत आल्यास महाराष्ट्र सरकारला भीती वाटण्याचे कारण काय? कंगना ही सुशांत सिंह राजपूत प्रकरणात गुंतलेले राजकारणी, नेते, अभिनेते अशा सगळ्यांचा पर्दाफाश करायला तयार आहे. तिच्या या साहसाचे स्वागत करण्याऐवजी महाराष्ट्र सरकार तिला धमकी देत आहे, असे कदम यांनी म्हटले.