...मग भाजपने इतका अट्टाहास कशासाठी केला- संजय राऊत

कालपर्यंत सांगत होते मुख्यमंत्री आमचाच, मग आता काय झाले

Updated: Nov 10, 2019, 07:11 PM IST
...मग भाजपने इतका अट्टाहास कशासाठी केला- संजय राऊत title=

मुंबई: अगदी कालपर्यंत मुख्यमंत्री आमचाच होणार असे ठासून सांगणाऱ्या भाजपला आता काय झाले, असा खोचक सवाल विचारत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळले आहे. भाजपने रविवारी संध्याकाळी राज्यपालांची भेट घेऊन आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याची माहिती दिली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपला सणसणीत टोला लगावला. 

त्यांनी म्हटले की, काल संध्याकाळपर्यंत भाजपचे नेते सरकार आमचेच येणार, मुख्यमंत्री आमचाच होणार, असे सांगत होते. आम्ही त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या. मात्र, आता तेच मागे हटले आहेत. भाजप सरकार स्थापन करणार नसेल तर त्यांचा मुख्यमंत्री कसा होणार. तसेच भाजपने शिवसेनेसोबत मुख्यमंत्रीपदाचा अडीच-अडीच वर्षांचा करार पाळायलाही नकार दिला. मग भाजपचा अट्टाहास नेमका कशासाठी होता, असा सवाल यावेळी राऊत यांनी विचारला.

आम्ही सरकार स्थापन करणार नाही; भाजपचा मोठा निर्णय

तत्पूर्वी भाजपने राज्यपालांना भेटून आम्ही सरकार स्थापन करणार नसल्याची माहिती दिली. या निर्णयाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली होती. भाजप, शिवसेना, रिपाई, रासप आणि रयत क्रांती अशा महायुतीने एकत्र विधानसभा निवडणूक लढवली होती. जनतेने महायुतीला भरघोस जनादेशही दिला होता.

'मातोश्री' आणि 'सिल्व्हर ओक'वर हालचालींना वेग

मात्र, शिवसेनेने जनमताचा अनादर करत सरकार स्थापन करण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपने सरकार न स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून सरकार स्थापन करायचे असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते.