मुंबई: भाजप महाराष्ट्रात अल्पमतातील सरकार स्थापन करणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. राज्यपालांनी दिलेले सत्तास्थापनेचे निमंत्रण स्वीकारून अल्पमतातील सरकार स्थापन करण्याच्या मुद्द्यावरून भाजपमध्ये दोन गट पडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच केंद्रीय नेतृत्त्वही या पर्यायाविषयी नाखूश असल्याचे समजते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले होते. यानंतर रविवारी सकाळी १२ वाजता भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली.
मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार- उद्धव ठाकरे
मात्र, तब्बल दोन तास चर्चा झाल्यानंतही कोणताही निर्णय होऊ शकला नव्हता. यावेळी झालेल्या चर्चेवेळी सत्तास्थापनेवरून भाजप नेत्यांमध्ये दोन गट पडल्याचे सांगितले जाते. राज्यपालांचे निमंत्रण स्वीकारून अल्पमतातील सरकार स्थापन करायचे का राज्यपालांकडून आणखी काही दिवसांचा अवधी मागून घ्यायचा, याविषयी नेत्यांमध्ये अजूनही स्पष्टता नाही.
शिवसेना राष्ट्रवादीसमोर सत्तास्थापनेसाठी प्रस्ताव ठेवणार?
त्यामुळे हे प्रकरण आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडे गेले आहे. दरम्यान, आता हा निर्णय घेण्यासाठी कोअर कमिटीच्या नेत्यांची पुन्हा एकदा बैठक बोलावण्यात आली आहे. तोपर्यंत केंद्रीय नेतृत्त्वाकडून संदेश येण्याची शक्यता आहे. अमित शहादेखील यावेळी भाजपच्या नेत्यांशी संवाद साधू शकतात. काहीवेळापूर्वीच ही बैठक सुरु झाली असून लवकरच भाजपच्या नेत्यांकडून या निर्णयाची घोषणा होऊ शकते.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी संध्याकाळी काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले होते. विधानसभा निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी बोलावले होते.