ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांचा पत्ता कट? पीयूष गोयल, प्रकाश मेहतांच्या नावाची चर्चा

किरीट सोमय्यांना शिवसेनेची नाराजी भोवली

Updated: Mar 23, 2019, 09:51 AM IST
ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांचा पत्ता कट? पीयूष गोयल, प्रकाश मेहतांच्या नावाची चर्चा title=

मुंबई: भाजपकडून लोकसभा उमेदवारांच्या दुसऱ्या यादीतही ईशान्य मुंबईतील उमेदवाराचे नाव जाहीर न करण्यात आल्यामुळे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कापला गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्याऐवजी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, मुंबई पालिकेतील नेते मनोज कोटक आणि प्रवीण छेडा यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरु झालेय. शिवसेनेच्या नाराजीमुळे सोमय्यांवर ही परिस्थिती ओढावल्याचे समजते. भाजप आणि शिवसेना यांच्यात मध्यंतरी वितुष्ट निर्माण झाले होते. या काळात किरीट सोमय्या यांनी शिवसेनेविरोधात आक्रमक आणि शेलक्या भाषेत टीका केली होती. त्यामुळे आता युती झाल्यानंतरही शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांचा प्रचार करण्यास ठाम नकार दिला होता.

परिणामी ईशान्य मुंबईसारख्या मतदारसंघात किरीट सोमय्यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा धोका पत्कारायचा का, असा प्रश्न भाजपच्या पक्षश्रेष्ठींना पडला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असतानाही भाजपने ईशान्य मुंबईतील उमेदवार घोषित केलेला नाही. सोमय्यांना उमेदवारी दिल्यास शिवसेनेची मते राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेकडे वळू शकतात. हाच धोका ओळखून आता भाजप नेतृत्वाकडून पीयूष गोयल यांच्यासारख्या तगड्या नेत्याला ईशान्य मुंबईच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, भाजपने शुक्रवारी रात्री जाहीर केलेल्या उमेदवारी यादीत महाराष्ट्रातील सहा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा मतदारसंघ असलेल्या पुण्याचाही समावेश आहे. पुण्यातून लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपच्या नेत्यांमध्ये अनेक दिवसांपासून रस्सीखेच सुरु होती. मात्र, या सगळ्यात पालकमंत्री गिरीश बापट उजवे ठरले असून पक्षाने त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे. उर्वरित पाच मतदारसंघांपैकी जळगावमधून स्मिता वाघ, नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर, दिंडोरीतून भारती पवार, बारामतीतून कांचन कुल आणि सोलापूरमधून डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे.