'जेव्हा शरद पवार विरोधी पक्षात, तेव्हा राज्यात दंगली..' भाजप नेत्याचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी बोचरी टीका केली होती. याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातच आता आणखी एका भाजप नेत्यांना शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 

Updated: Jun 9, 2023, 05:00 PM IST
'जेव्हा शरद पवार विरोधी पक्षात, तेव्हा राज्यात दंगली..' भाजप नेत्याचा गंभीर आरोप title=

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आलेल्या धमकीचं प्रकरण ताजं असतानाच आता एका भाजप (BJP) नेत्याने शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जेव्हा जेव्हा शरद पवार सत्तेच्या बाहेर राहिले आहेत, तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात दंगली (Maharashtra Riots) झालेल्या आहे. सत्ताधारी पक्ष हा राज्यात शांतता अपेक्षित करत असतो, तो दंगली घडवत नसतो. त्यामुळे राज्यात होत असलेल्या दंगलींमागे विरोधी पक्षच आहे का याची चौकशी व्हायला हवी. असं भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी म्हटलंय. शरद पवार यांना धमकी आली असेल तर राज्य सरकार या प्रकरणाी चौकशी करेल, यात कोण दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. धमकीमागे कोण आहे, कुठून आली या गोष्टींचा राज्याचे गृहमंत्री तपास करतील आणि सत्य राज्यातील जनतेसमोर आणलं जाईल असंही दरेकर यांनी सांगितलं.

निलेश राणे यांची टीका
त्या आधी भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. 'या देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन या दोन समाजांच्याबाबत चिंता वाटावी असं चित्र आहे', असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. यावर बोलताना निलेश राणे यांनी शरद पवार यांची तुलन थेट औरंगजेबाशी (Aurangazeb) केली. निलेश राणे यांच्या वक्तव्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं. पवार साहेब जेवढी मुस्लिमांची बाजू घेतात, तेवढी हिंदू समाजाची कधी बाजू घेत नाही. म्हणून मला असं वाटलं की औरंगजेब परत जन्मला आला' असं निलेश राणेंनी सांगितलं.

राष्ट्रवादीचे कार्यकर्त आक्रमक
 निलेश राणे यांनी केलेल्या टीकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालीय. शरद पवारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी मुंबईच्या आझाद मैदानात जेलभरो आंदोलन करण्यात आलं...यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार असं वादग्रस्त वक्तव्य निलेश राणेंनी केलं होतं. त्यावरून राष्ट्रवादी आक्रमक झालीय. 

शरद पवार यांची सुरक्षा वाढवली
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन माहिती दिली आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे . परिमंडळ 2 चे पोलीस आयुक्त मोहित कुमार गर्ग यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन सुरक्षेचा आढावा घेतला. शरद पवार यांना समाज माध्यमातून धमकी देण्यात आली त्या पार्श्वभूमीवर हा सुरक्षा आढावा घेतला आहे.

शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
धमकी प्रकरणावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया आलीय. 'ज्याची कायदा आणि सुव्यवस्था संभाळण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांनी यासंबंधातील काळजी घ्यायची. या राज्यामध्ये लोकशाही पद्धतीने आवाज कोणाचं बंद करु शकेल असं वाटतं असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. मी धमक्यांची चिंता करत नाही. पण ज्यांच्या हातामध्ये राज्याची सुत्र आहेत त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही' असं शरद पवारांनी म्हटलं आहे.