मुंबई : मुंबई महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहामधी चार बालकांच्या मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी भाजपा नगरसेवकांनी महापौर कार्यालयाबाहेर जोरदार निदर्दनं केली. यावेळी पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
भांडुप इथल्या पालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहातील वातानुकुलित यंत्रणेमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे नवजात अर्भकांसाठीच्या अतिदक्षता कक्षातील चार दुर्दैवी बालकांचा सेफ्टीक शॉकने (Septic Shock- Infection)मृत्यू झाला असून एक बालक अत्यवस्थ आहे. एनआयसीयूमध्ये जीवघेणे इन्फेक्शन होतेच कसे? असा प्रश्न उपस्थित करत पेंग्विन बाळाच्या बारशात मशगुल सत्ताधाऱ्यांना बालमृत्यूने शोकाकुल असणाऱ्या मुंबईकरांचे सोयरसुतक नसून पालिकेची आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे अशी घणाघाती टीका प्रभाकर शिंदे यांनी केली.
रुग्णालयातील नवजात अर्भकांसाठीच्या अतिदक्षता कक्षामधील चार बालकांचा सेफ्टीक शॉकनेच मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. रुग्णालयातील एनआयसीयु (नवजात शिशु अतिदक्षता विभाग) हा महापालिका चालवत नसून त्याचे कंत्राट खाजगी वैद्यकीय संस्थेस दिले आहे. या संस्थेबाबत आरोग्य समितीत आवाज उठवल्यानंतरही सत्ताधारी शिवसेनेने आणि रुग्णालय प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे असा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.
केवळ निष्काळजीपणामुळे नवजात अर्भकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरवर्षी साडेचार हजार कोटी आरोग्य यंत्रणेवर खर्च केल्यानंतरही मुंबईकरांच्या नशिबी असे दुर्दैवी मृत्यू असतील तर पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर कोणी विश्वास ठेवण्यास धजावेल का ? असा सवाल प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला.
याप्रकरणी रुग्णालय व्यवस्थापन खाजगी संस्थेकडून काढून घेऊन सदर खासगी संस्थेचा वैद्यकीय परवाना आणि नोंदणी रद्द करावी तसंच या नवजात अर्भकांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित रुग्णालय प्रशासन डॉक्टर आणि खाजगी संस्थाचालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.