मुंबई: राज्यात राजकीय अस्थिरतेचं वातावरण असताना महाविकास आघाडीकडून महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. वरळी, ना.म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळीतील निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याना पुनर्विकास प्रकल्पांतर्गत 50 लाख रुपयांऐवजी 25 लाख रुपयात घरं देण्यात येणार आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पोलिसांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
"माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आणि माझे नेते शरद पवारसाहेब ह्यांच्या सल्ल्यानुसार बीडीडी चाळीतील निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी घर नावावर करून देण्यात आले. आता ती घरं 50 लाख ऐवजी 25 लाख रुपयात देण्यात येतील. आता घरं रिकामी करा आणि प्रकल्प पुढे जाऊद्यात.", असं ट्वीट करत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 24 तास जनतेसाठी असं हॅशटॅग टाकलं आहे.
मुंबई शहरातील बीडीडी चाळी सुमारे 100 वर्षांपेक्षाही जुन्या आहेत. त्यामुळे बीडीडी चाळींचा पुनर्विकास कार्यन्वित करण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे. या प्रकल्पाचं भूमिपूजन 2017 मध्ये झालं. मात्र अनेक कारणांमुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. वरळीतील कामाला जुलै 2021 मध्ये सुरुवात झाली. तर आता नायगावमधील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला सुरुवात करण्यात येत आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाअंतर्गत 15 हजारांहून अधिक भाडेकरूंना 500 चौरस फुटांचे मोफत हक्काचे घर देण्यात येणार आहे. या तिन्ही चाळींमध्ये पोलीस कुटुंबही वास्तव्यास आहेत.