मुंबई : पवईमध्ये एकाच वेळी अनेक ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे गायब झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात 'कार्ड क्लोनिंग'चा प्रकार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व प्रकरणाबाबत 5 जणांनी पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या 5 जणांच्या खात्यामधून वेगवेगळ्या वेळी 3 लाख 20 हजार रुपये एवढी रक्कम काढण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॉलिवूड कलाकारांना व्यायामाचे प्रशिक्षण देणारे प्रज्वल शेट्टी हे पवई तुंगा परिसरात राहतात. 12 एप्रिल रोजी शेट्टी यांनी हिरा पन्ना मॉलमधून प्रोटीन सप्लिमेंट खरेदी केले आणि साडेदहा हजार रुपये कार्डव्दारे भरले.
दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांनी मोबाईलवर 2 मेसेज पाहिले. त्यामध्ये 10-10 हजार रुपये दोनदा काढण्यात आल्याचे समोर आले. हे मेसेज वाचत असतानाच, आणखी काही मेसेज एकामागे एक आले आणि एकूण 1 लाख रुपये काढण्यात आले.
पैसे काढले जात असतानाच शेट्टी यांनी बँकेला फोन करुन चौकशी केली आणि याबाबत त्यांनी बँकेला कळवल्यानंतर त्यांचे एटीएम कार्डवरील व्यवहार बंद करण्यात आले. त्यानंतर शेट्टी यांनी तक्रार करण्यासाठी तात्काळ पवई पोलिस ठाणे गाठले. शेट्टी तक्रार करत असतानाच, समीर शाह हे पोलिस ठाण्यात आले. त्यांच्या बँक खात्यामधूनदेखील विलेपार्ले येथील एका एटीएममधून 1 लाख रुपये काढण्यात आले.
पवईच्या फिल्टरवाडा येथे राहणाऱ्या मंगेश मुसळंबे या तरुणाच्या खात्यातूनदेखील 20 हजार इतकी रक्कम काढण्यात आली. मोहम्मद मुख्तार आलम हेदेखील याचवेळी तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात आले. त्यांच्या खात्यामधून 40 हजार रुपये काढण्यात आले.
पाचही व्यक्तींच्या बँक खात्यामधून 11 एप्रिल रात्रीपासून ते 12 एप्रिल सकाळपर्यंतच्या कालावधीत पैसे काढण्यात आले. हे पैसे वेगवेगळ्या ठिकाणाहून काढण्यात आले असले, तरी यामागे एकच टोळी असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.