काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

ग्रामीण भागाशी संबंधित महत्त्वाचं खातं पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसचे अजूनही प्रयत्न सुरू आहेत. 

Updated: Jan 1, 2020, 01:04 PM IST
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : ग्रामीण भागाशी संबंधित महत्त्वाचं खातं पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसचे अजूनही प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत

महाराष्ट्र विकास आघाडीतील खातेवाटपात ग्रामीण भागाशी संबंधित असलेल्या महत्त्वाच्या खात्यांपैकी खातं काँग्रेसच्या वाट्याला एकही खाते आलेले नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षात नाराजी आहे. 

काल दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत ग्रामीण भागाची संबंधित ग्रामविकास, कृषी किंवा सहकार या खात्यांपैकी एक खाते काँग्रेसला मिळावे अशी चर्चा झाली. त्या चर्चेनंतर यासंदर्भात बाळासाहेब थोरात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत.

तर दुसरीकडे शिवसेनेत कुणाला कोणतं खातं मिळणार?

काँग्रेस-राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेच्या खातवाटपाची चर्चा सुरू झालीय. मंत्री आदित्य ठाकरे यांना उच्च शिक्षण, क्रीडा किंवा पर्यावरण खातं दिलं जाण्याची शक्यता सामनातून वर्तवण्यात आल्यानंतर आजच्या सामनात आणखी तीन जणांची नावं पुढं आली आहेत. 

कृषी खातं गुलाबराव पाटील किंवा दादा भुसेंना मिळण्याची शक्यता आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या मनात सुभाष देसाईंसारख्या ज्येष्ठ नेत्याला कृषी खातं देण्याची योजना आहे. त्यामुळे या खात्यासाठी शिवसेनेत चढाओढ होण्याची शक्यता आहे. 

तर दुसरीकडे काँग्रेसलाही कृषी खातं हवं असल्याची दिल्लीतल्या बैठकीत करण्यात आलीय. त्यामुळे या खात्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्येही रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.