बाळासाहेब ठाकरे यांना भावलेले ते 'चिकणे' आमदार कोण? ज्यांना बाळासाहेबांनी केलं मंत्री..

मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात काही तरुण चेहरे होते. त्यापैकी काही जणांना बाळासाहेबांनी राज्यमंत्री पद दिलं होतं. यातील दोन तरुण कर्तृत्ववान चेहरे बाळासाहेब ठाकरे यांना अधिक आवडायचे.

Updated: May 4, 2022, 08:36 PM IST
बाळासाहेब ठाकरे यांना भावलेले ते 'चिकणे' आमदार कोण? ज्यांना बाळासाहेबांनी केलं मंत्री.. title=

मुंबई : १९९५ साली राज्यात पहिल्यांदा युतीचं सरकार आलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackarey ) यांचे विश्वासू मनोहर जोशी ( Manohar Joshi ) मुख्यमंत्री झाले. तर भाजपचे गोपीनाथ मुंडे ( Gopinath Munde ) उपमुख्यमंत्री होते. युती सरकारला अस्तित्वात आलं ते ४० अपक्ष आमदारांच्या पाठींब्यावर, त्यामुळे अपक्ष आमदारांनाही मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आलं होतं.

मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात काही तरुण चेहरे होते. त्यापैकी काही जणांना बाळासाहेबांनी राज्यमंत्री पद दिलं होतं. यातील दोन तरुण कर्तृत्ववान चेहरे बाळासाहेब ठाकरे यांना अधिक आवडायचे. बाळासाहेब नेहमी त्यांना 'चिकणे हिरो' असे म्हणत.

१९९५ साली राज्यात विधानसभेची निवडणूक लागली होती. शरद पवार यांच्या हाती असलेली सत्ता मिळविण्यासाठी शिवसेना, भाजप यांनी आपली पूर्ण शक्ती पणाला लावली होती. शरद पवार (Shard Pawar), विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh), सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी काँग्रेसकडून तर बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन (Pramod Mahajn), गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) असा सरळ सामना होता.

शरद पवार हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते ओळखले जात होते. त्यांना जाब विचारण्याची पक्षात कुणामध्येच हिंमत नव्हती. पण, या निवडणुकीत त्यांना एक धक्का बसला. शरद पवार यांची विदर्भात सभा उधळली गेली होती.

नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे पवार यांचे कट्टर समर्थक सोनूबाबा उर्फ सुनील शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली. त्यांच्या विरोधात उभे होते भाजपच्या प्रेरणाताई बारोकर आणि शेकापचे वीरेंद्र देशमुख. यासोबतच एक तरुण गोरा गोमटा चेहरा या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभा होता.

हा गोरा गोमटा आमदार काँग्रेसचा कार्यकर्ता. पाच वर्ष मेहनत घेऊन त्यांनी मतदार संघ बांधला. पण, ऐनवेळी उमेदवारी डावलण्यात आली आणि त्याने अपक्ष म्हणू अर्ज भरला. त्याला निशाणी मिळाली चष्मा.. घराघरात चष्मा पोहोचविण्यासाठी कार्यकर्ते मेहनत घेत होते.

अशातच अजय देवगण (Ajay Devgan) आणि खिलाडी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सुहाग' सिनेमा आला होता. कुणी तरी सुचवलं 'गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा' गाणं प्रचारात वापरायचं.. काला गॉगल लावून तो उमेदवार प्रचारात उतरला आणि पहाता पहाता तो अपक्ष उमेदवार आमदार म्हणून निवडून आला. 

ते आमदार म्हणजे सध्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख. त्याकाळी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या काळा गॉगल घातलेल्या फोटोने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. 

बाळासाहेबांचे दुसरे फेव्हरेट चिकणे आमदार म्हणजे कॉग्रेसचे माजी खासदार शंकरराव पाटील यांचा पुतण्या हर्षवर्धन पाटील आहेत. इंदापुर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून ते निवडून आले होते. विद्यार्थीदशेपासुनच हर्षवर्धन राजकारणात होते. चुलत्यांच्या मागे ते खंबीरपणे उभे राहिले. इंदापूरमधून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून ते जिंकून आले होते. 

१९९५ च्या निवडणुकीत राज्यात काँग्रेस हरली. पण, विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसमधून बंडखोरी केलेलं अनेक उमेदवार आमदार म्हणून निवडून आले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळवण्याची जबाबदारी मनोहर जोशी, उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविली होती. 

या दोघांच्या प्रयत्नामुळे अनेक अपक्ष आमदार युती सरकारमध्ये सामील झाले. त्याचे नेतृत्व हर्षवर्धन पाटील यांनी केलं. बाळासाहेबांनी युती सरकारला हिरवा कंदील दाखविला. त्यावेळी अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि हर्षवर्धन पाटील (Harshvardhn Patil) हे मातोश्रीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला गेले. या दोघांना पाहून बाळासाहेब म्हणाले, 'यांना कशाला मातोश्रीवर बोलवलं? हे तर आपले चिकणे हिरो आहेत. हे येणार हे माहित असतं तर मीच त्यांना भेटायला गेलो असतो.'

मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात अनिल देशमुख यांना शालेय शिक्षण व सांस्कृतिक राज्यमंत्री तर हर्षवर्धन पाटील यांच्याकडे कृषी आणि पणन राज्यमंत्री पद देण्यात आलं होतं.