मुंबईत पाणीकपात वाढणार, की रद्द होणार? पुढचा आठवडा महत्त्वाचा

Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पाणीकपातीचा निर्णय लागू करण्यात आला होता. आता याच निर्णयाबाबतची मोठी आणि सविस्तर माहिती समोर आली आहे. ज्याबाबतचा अंतिम निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे. 

सायली पाटील | Updated: Jul 31, 2023, 09:17 AM IST
मुंबईत पाणीकपात वाढणार, की रद्द होणार? पुढचा आठवडा महत्त्वाचा  title=
average monsoons withdraws Water Cut issue in 74 Percent Water Storage In Seven Dams

Mumbai News : जास्त पाऊस पडला, मुंबई तुंबली; कमी पाऊस पडला, मुंबईत पाणीकपात.... कारण काहीही असो, संकट कोणतंही असो त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम मुंबईकरांच्या आयुष्यावर होत असतो. मग तो त्यांचा प्रवास असो किंवा अगदी त्यांना मिळणाऱ्या सुविधा असो. शहरातील नागरिकांच्या सुविधांविषयी चर्चा होण्याचं कारण म्हणजे, मुंबईकरांचा पाणीप्रश्न. मागील काही दिवासंपासून सातत्यानं सुरु असणाऱ्या पावसाचे सकारात्मक परिणाम होताना दिसत असून, येत्या काही दिवसांतच त्याचा अंतिम निकालही हाती येईल. थोडक्यात सध्याच्या घडीला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठा 74 टक्क्यांवर पोहोचला आहे. आता हाच पाणीसाठा शहरातील पाणीकपात रद्द करण्यास मदत करू शकतो. 

साधारण आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत लागू करण्यात आलेला 10 टक्के पाणीकपातीचा निर्णय मागे घेतला जाऊ शकतो. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये संपूर्ण आढावा घेतल्यानंतरच पाणीकपातीच्या निर्णयाबाबत फेरविचार केला जाईल.

हेसुद्धा वाचा : आलिशान महालाहून कमी नाहीत Indian Railway च्या 'या' ट्रेन; तिकीट दर माहितीयेत?  

कोणकोणत्या तलावामध्ये समाधानकारक पाणीसाठा? 

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा, भातसा, वैतरणा, विहार, तुळशी, मोडकसागर, मध्य वैतरणा या तलावांमध्ये एकूण 10 लाख 70 हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा जमा झाला आहे. थोडक्यात सध्या पाणीसाठा वाढलेला असला तरीही पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. हवामान विभागाचा सध्याचा अंदाज पाहता पुढील 10 दिवस पावसाचा जोर ओसरणार आहे. त्यामुळं धरणांची पाणीपातळी स्थिर राहील किंवा त्यात फारशी वाढ होणार नाही. ज्यामुळं पालिका प्रशासनानं पाणीकपातीचा निर्णय मागे घेण्यात कोणतीही घाई केलेली नाही. 

शहरात दर दिवशी किती पाणीपुरवठा? 

वर नमुद करण्यात आलेल्या सातही धरणांमधून मुंबईला दर दिवशी तब्बल 3800 दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा केला जातो. सातही तलावांची साठवण क्षमता पूर्ण झाल्यास एकूण पाणीसाठा 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लीटर इतक्यावर पोहोचतो. ज्यानंतर शहरात पूर्ण क्षमतेनं पाणीपुरवठा केला जातो. मुख्य म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव पूर्ण भरलेले असले तरच वर्षभर पुरेसा पाणीपुरवठा शक्य होतो. त्यामुळं सध्याची पाणीकपात मागे घेण्यात पालिका प्रशासन कोणतीही घाई करताना दिसत नाहीये. 

कोणत्या तलावात किती पाणीसाठा? 

तुळशी 100 टक्के 
विहार  100 टक्के 
भातसा  66.38 टक्के 
तानसा 100 टक्के
मोडक सागर 100 टक्के
उर्ध्व वैतरणा 49.79 टक्के
मध्य वैतरणा  89.51 टक्के