'फक्त शाकाहारी लोकांना बसण्याची परवानगी'; आयआयटी बॉम्बेच्या हॉस्टेल कॅन्टीनमधील पोस्टरवरून नवा वाद

IIT Bombay : वसतिगृहाच्या कॅन्टीनमध्ये मांसाहार केल्यामुळे एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याने अपमानित केल्याच्या आरोपावरून प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेमध्ये वादाला तोंड फुटले आहे. वसतिगृहाच्या कॅन्टीनमध्ये मांसाहारी विद्यार्थ्यांना बसण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाल्याचे म्हटलं जात आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 31, 2023, 08:41 AM IST
'फक्त शाकाहारी लोकांना बसण्याची परवानगी'; आयआयटी बॉम्बेच्या हॉस्टेल कॅन्टीनमधील पोस्टरवरून नवा वाद title=

Vegetarians Row : प्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती (Sudha Murti) यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या शाकाहारी मांसाहारी खाण्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर जोरदार चर्चा सुरु झाली होती. अशातच आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-बॉम्बे (IIT Bombay) च्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या कँटीनच्या भिंतीवर 'फक्त शाकाहारी  लोकांना बसण्याची परवानगी आहे' (Vegetarians only) असे पोस्टर चिकटवल्यानंतर भेदभावाचा मुद्दा उपस्थित केला आहे. एका विद्यार्थी प्रतिनिधीने रविवारी ही माहिती दिल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.. गेल्या आठवड्यात, आयआयटी मुंबईच्या वसतिगृह-12 च्या कॅन्टीनवर एक पोस्टर चिकटवण्यात आले होते, ज्यामध्ये 'येथे फक्त शाकाहारी लोकांना बसण्याची परवानगी आहे' असे लिहिले होते. या संदर्भातील एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयआयटी मुंबईमध्ये मांसाहारी खाण्यावरून विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. वसतिगृहाच्या कॅन्टीनमध्ये मांसाहार खाल्ल्याने एका विद्यार्थ्याला दुसऱ्या विद्यार्थ्याने अपमानित केल्याचे म्हटलं जात आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर इंडिया टुडेला सांगितले की, गेल्या आठवड्यात हॉस्टेल 12 च्या कॅन्टीनमध्ये ही घटना घडली होती. त्यानंतर विद्यार्थ्याने दावा केला की काही विद्यार्थ्यांनी कॅन्टीनच्या भिंतींवर पोस्टर चिकटवले होते, ज्यावर 'येथे फक्त शाकाहारी लोकांना बसण्याची परवानगी आहे', असे लिहीले होते.

तीन महिन्यांपूर्वी आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी आरटीआय दाखल करून संस्थेकडून फूड पॉलिसीची माहिती मागवली होती. यावेळी त्यांना सांगण्यात आले की, संस्थेत जेवणाबाबत वेगळी मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. संस्थेत अजूनही विद्यार्थ्यांसाठी भोजनाच्या पर्यायांवर आधारित स्वतंत्र आसनव्यवस्था ठेवली आहे. हे प्रकरण काही विद्यार्थ्यांनी ट्विटरवर मांडले आणि त्याला संतापजनक म्हटले. आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कल (APPSC) नावाच्या विद्यार्थ्यांच्या गटाने ट्विट करत याबाबत रोष व्यक्त केला. "आरटीआय आणि मेल्सवरून असे दिसून आले आहे की संस्थेचे वसतिगृह जीसेकसाठी 'फूड सेग्रीगेशन' बाबत कोणतेही धोरण नाही. काहींनी मेसचा काही भाग शाकाहारींसाठी राखून ठेवला आहे. मांसाहार करणाऱ्यांना त्यापासून दूर बसावे लागते," असा दावा या विद्यार्थी संघटनेनं केला आहे.

जैन विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वेगळी जागा

या घटनेनंतर वसतिगृहाच्या सरचिटणीसांनी सर्व विद्यार्थ्यांना ई-मेल पाठवला आहे की, वसतिगृहाच्या कॅन्टीनमध्ये जैन काउंटर आहे. परंतु जैन जेवण करणाऱ्यांसाठी अशी कोणतीही नियुक्त जागा नाही. काही विद्यार्थ्यांनी कॅन्टीनच्या काही भागांना जैन बसण्याची जागा म्हणून ठरवली आहे आणि त्या भागात मांसाहार आणणाऱ्या विद्यार्थ्यांना बसू देत नसल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

दरम्यान, संस्थेच्या एका अधिकाऱ्याने दावा केला की, त्यांना असे पोस्टर सापडले होते, मात्र ते कॅन्टीनच्या बाहेर कोणी लावले होते, हे आम्हाला माहीत नव्हते. त्यांनी सांगितले की विविध प्रकारचे खाद्यपदार्थ असलेल्या लोकांसाठी येथे निश्चित जागा नाहीत आणि पोस्टर्स कोणी लावले आहेत याची माहिती संस्थेला नाही.