मुंबई : भाजप संसदीय समितीची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होत आहे. आज भाजपाची पहिली यादी जाहीर होणार आहे. संध्याकाळी संसदीय समितीची बैठक होणार आहे. त्यात महाराष्ट्रातल्या उमदेवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल. त्यासाठी मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील आज दिल्लीत असणार आहेत. परंतु, यादी जाहीर होण्याआधीच जागांवर आपला हक्क सांगत काही नेत्यांनी प्रचाराला सुरुवातही केलेली दिसतेय.
'उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग' या म्हणीची प्रचिती मुंबई नजिकच्या मीरा रोड इथे पाहायला मिळाली. भाजपा शिवसेना यांच्यामध्ये जागावाटपाबाबत अजून चर्चा सुरु आहे, तसंच उमेदवारांची यादीही जाहीर झालेली नाही. मात्र मीरा रोडमधून भाजपचे आमदार आणि यंदाचे इच्छुक उमेदवार नरेंद्र मेहता यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे.
विशेष म्हणजे भाजपाच्या माजी महापौर गीता जैन यांनीही या जागेवर दावा केला आहे. तर शिवसेनेनंही नरेंद्र मेहता यांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे
जवळपास दोन वर्षांपूर्वी, पत्नी सुमन हिला ५.५ करोड रुपयांची गाडी वाढदिवसाला गिफ्ट दिल्यानंतर नरेंद्र मेहता चर्चेत आली होती. सुमन यांच्या गाडीनं यू टर्न घेताना एका रिक्षाला धडक मारल्यानंतर त्याची मोठी चर्चा झाली होती. मुंबई आणि उपनगरांत मेहता बांधकाम, आरोग्य आणि शिक्षण प्रकल्पांत गुंतवणूक आहे. २०१४ साली ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले होते. तसंच त्यांनी एकेकाळी मीरा-भायंदरचे महापौर म्हणूनही काम पाहिलंय.