मुंबई : भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शेलार आज सकाळीच कृष्णकुंजवर पोहोचले. सकाळी १०च्यासुमारास शेलार राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले. सुमारे अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. एकीकडे राज ठाकरे त्यांच्या भाषणातून आणि व्यंगचित्रतून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्ला करत असताना शेलार त्यांच्या घरी पोहोचल्यानं राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, त्यांच्यातील चर्चेचं कारण मात्र अद्याप पुढे आलेल नाही.
राज ठाकरे यांनी भाजपला कडवा विरोध करताना भाजपच्या धोरणावर कडाडून टीका केली. मात्र, राज यांची राजकीय खेळी वेगळी असल्याचे चित्र देवरुख नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले. रत्नागिरीत नगरपंचायत निवडणुकीत भाजप-मनसे युती दिसून आली. त्यामुळे देवरुखमध्ये शिवसेनेला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे राज ठाकरे यांची मनसे चांगलीच चर्चेत आलेय.
दरम्यान, राजापूर येथील नाणार प्रकल्पाबाबत राज ठाकरे यांनी जातीने लक्ष घातलेय. त्यांनी या प्रकल्पाला विरोध करताना आम्ही ग्रामस्थांच्या पाठिशी आहोत, असे स्पष्ट केले. भाजप विरोधात शिवसेना, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनीही नाणार प्रकल्पाला विरोध केलाय. त्यातच मनसेचीही भर पडलेली दिसून येत आहे. त्यामुळे कोकणात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहे. मनसे आपली पाळेमुळे ग्रामीण भागत रुजविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे देवरुख निवडणुकीवरुन दिसून येत आहे. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते, असा संदेश मनसेने या निवडणुकीतून भाजपशी युती करुन दिलाय. याच पार्श्वभूमीवरुन आशिष शेलार यांची भेट असल्याची चर्चा आहे.