Aarvind Kejariwal: "घाबरणारे लोक..."; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर केजरीवाल यांचा भाजपावर हल्लाबोल

Arvind Kejriwal Meets Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्या मुंबईमधील 'मातोश्री' या निवासस्थानी केजरीवाल यांच्याबरोबरच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही भेट देऊन राजकीय विषयांवर चर्चा केली.

Updated: Feb 25, 2023, 03:58 PM IST
Aarvind Kejariwal: "घाबरणारे लोक..."; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर केजरीवाल यांचा भाजपावर हल्लाबोल title=
Kejriwal Meet Uddhav Thackeray

Arvind Kejriwal meet Uddhav Thackeray: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी आज मुंबईमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली. ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवसस्थानी या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांची भेट घेतली. या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंच्या हातून पक्ष आणि चिन्ह गेल्याच्या मुद्द्याबरोबरच सीबीआय, ईडीचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंबरोबर युती करणार का?

मुंबईमधील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी केजरीवाल यांना निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दल विचारलं. त्यावर उत्तर देताना, "मी एकच गोष्ट सांगेन की मागील काही दिवसांमध्ये जे काही घडलं त्यानंतर उद्धवजींचा पक्ष चोरीला गेला. त्यांच्या पक्षाचं नाव चोरीला गेलं, निवडणुकीचं चिन्ह चोरीला गेलं. सर्व काही चोरी करुन गेले. यांचे वडील वाघ होते आणि उद्धवजी हे त्यांचे पुत्र आहेत," असं केजरीवाल म्हणाले. "संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याबरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून नक्कीच सकारात्मक असेल. माझं असं मत आहे की येणाऱ्या सर्व निडणुकींमध्ये उद्धव ठाकरे विजयी होतील," असंही केजरीवाल यांनी सांगितलं. "निवडणुका लढवताना तुम्ही उद्धव ठाकरेंबरोबर युती करणार का?" असा प्रश्न केजरीवाल यांना विचारण्यात आळा. त्यावर उत्तर देताना केजरीवाल यांनी, "निवडणूक येईल तेव्हा तुम्हाला सगळं काही सांगू," असं उत्तर दिलं.

दिल्लीतील गोंधळावर केलं भाष्य...

दिल्ली महानगरपालिकेतील गोंधळाबद्दल विचारलं असता केजरीवाल यांनी, "तुम्ही त्यांनाच विचारा. आज सगळीकडे गुंडगिरी दिसून येत आहे. त्यांच्याकडे देशाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांनी देशाचा विचार केला तर आपली फार प्रगती होईल. अशाप्रकारे लढत राहिल्याने देश पुढे जाणार नाही. आपण एकमेकांशी का लढत नाही, आपण एवढी गुंडगिरी का करतोय? दिल्लीच्या जनतेनं 134 जागा आम्हाला आणि 104 जागा त्यांना दिल्या तर महापौर आमचाच असला पाहिजे. उपमहापौर, स्थायी समिती आमचीच असली पाहिजे. मागील दीड महिन्यांपासून काहीच घडताना दिसत नाहीय. महापौर पदाच्या निवडणुकीसाठी कोर्टात जावं लागतं हे फार वाईट आहे," असा टोला केजरीवाल यांनी लगावला.

केंद्रीय संस्थांच्या वापरावरुन टोला

केंद्रीय संस्थांचा वापर होत आहे. दिल्लीतील परिस्थिती, महाराष्ट्रातील परिस्थिती याबद्दल तुमची काही उद्धव यांच्याबरोबर चर्चा झाली का? "पाहा असा वापर घाबरणारे लोक करतात. ईडी, सीबीआय या संस्थांचा वापर घाबरणारे लोक करतात. करु द्या वापर. घाबरट लोक याच संस्था वापरतात. तुमच्या घरी ईडी नाही आली, सीबीआय आली नाही. यांच्या घरी येते, माझ्या घरी येते. परवा म्हणाले मनिष सिसोदियांना अटक करणार. करा आम्हाला काही फरक पडत नाही. जनता पाहत आहे. शेवटी सत्याचा विजय होतो," असं केजरीवाल म्हणाले.