२०१४ साली शिवसेनेशी युती का तुटली?, यावर जेटलींचा गौप्यस्फोट

शिवसेनेला मोठ्या भावाचा सन्मान देऊन जास्तीच्या जागा सोडायला तयार होतो. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 4, 2018, 09:36 PM IST
२०१४ साली शिवसेनेशी युती का तुटली?, यावर जेटलींचा गौप्यस्फोट title=

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी शिवसेनेबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. युती तोडताना खरंतर आम्ही 2014साली, शिवसेनेला मोठ्या भावाचा सन्मान देऊन जास्तीच्या जागा सोडायला तयार होतो. पण त्यांना खूपच जास्त जागा हव्या होत्या, त्यामुळेच युती तुटली, असा गौप्यस्फोट अरुण जेटली यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना केला आहे.

आंध्र प्रदेशसाठी स्वतंत्र पॅकेज जाहीर करणार-जेटली

जेटली यांनी एनडीएतील घटक पक्षांच्या नाराजीबद्दल बोलताना हे वक्तव्य केलं आहे. चंद्राबाबू नायडू बजेटबाबत नाराज असले, तरी केंद्र सरकार आंध्रप्रदेश राज्यासाठी स्वतंत्रपणे आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. त्यामुळे तेलगू देसमची नाराजी दूर झाली आहे, तसेच एनडीएपासून फारकत घेऊ पाहणाऱ्या शिवसेनेबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शिवसेनेला ठाऊकचं नव्हतं नेमक्या किती जागांवर लढायचं आहे- जेटली

'शिवसेनेला गेल्या विधानसभा निवडणुकीत ठाऊकच नव्हतं की, त्यांना नक्की किती जागांवर लढायचं आहे. आम्ही त्यांना मोठ्या भावाच्या भूमिकेत स्वीकारायला तयार होतो. मात्र, त्यांचा गोंधळ कायम होता. अखेरीस आम्हाला स्वतंत्र लढावं लागलं, यातही भाजपनेच जास्त जागा मिळवल्या. खरंतर आगामी निवडणुकीतही, वेगळं लढण्याने आम्हाला फायदा होईल, असं मी म्हणणार नाही. माझी इच्छा आहे की एनडीए एकसंघ रहावा, असं अरूण जेटली यांनी म्हटलं आहे.