Ananya Sanman Winner 2021: 'अनन्य सन्मान' विजेत्यांचा शानदार गौरव, पाहा कोण आहेत मानकरी

Ananya Sanman Winner 2021: समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये अनन्य साधारण योगदान देणाऱ्या विभूतींचा 'झी 24 तास अनन्य सन्मान'  (ZEE 24 Taas Ananya Samman) हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.  

Updated: Mar 26, 2022, 09:44 PM IST
Ananya Sanman Winner 2021: 'अनन्य सन्मान' विजेत्यांचा शानदार गौरव, पाहा कोण आहेत मानकरी title=

मुंबई :  Ananya Sanman Winner 2021 : समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये अनन्य साधारण योगदान देणाऱ्या विभूतींचा 'झी 24 तास अनन्य सन्मान'  (ZEE 24 Taas Ananya  Sanman) हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यंदाचा 'अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कार' पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना देण्यात आला. तसेच सामाजिक क्षेत्रासाठी सखाराम रमाबाई तोरणे यांना, शिक्षण क्षेत्रासाठी शिवाजी अंबुलेगकर, क्रीडा क्षेत्रात  भरीव कामगिरी करणारे प्रवीण व्यवहारे, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शांताबाई धाडे यांने गौरविण्यात आले. तसेच पर्यावरणासंदर्भात काम करणारे सुहास वायंगणकर यांना सन्मानीत करण्यात आले. 

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना या वर्षीचा 'अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कारा'नं सन्मानित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, 'मी झी वाहितीचे मनापासून आभार मानतो. हा माझा सन्मान पाहायला दीदी (लता मंगेशकर) हवी होती. आज ती नाहीय, त्यामुळे मला फारसा आनंद होत नाही.'

Ananya Sanman Winner 2021: 'अनन्य सन्मान' विजेत्यांचा शानदार गौरव, पाहा कोण आहेत मानकरी

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे,  'झी २४ तास'चे मुख्य संपादक नीलेश खरे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी कुलगुरु स्नेहलता देशमुख, भारताची आघाडीची धावपटू ललिता बाबर, ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर, पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील, बुलडाणा अर्बन को.ऑ. क्रेडीट सोसायचीच्या विभागीय व्यवस्थापक योगिनी पोकळे, संजय भुस्कुटे, शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर, पुना गाडगीळ अ‍ॅण्ड सन्सचे सीईओ अमित मोडक, मन:शक्ती प्रयोग केंद्र संशोधक संचालक गजानन केळकर, राज शेळके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

झी 24 तास । अनन्य सन्मान विजेते 2021 आणि त्यांची थोडक्यात कामगिरी

कपिल शेळके - उद्योग क्षेत्र : कपिल शेळके. टॉर्क मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या इलेक्ट्रिक बाईक कंपनीचे संस्थापक आणि सीईओ. पिंपरी चिंचवडला लहानाचा मोठा झालेला एक तरुण स्टार्ट अप कंपनी सुरू करतो काय. आणि रतन टाटा यांच्यासारखे देशातले सर्वात बडे उद्योगपती त्याच्या कंपनीत गुंतवणूक करतात काय. सगळंच निव्वळ अविश्वसनीय. याच वर्षी टॉर्क मोटर्सनं क्रॅटोस आणि क्रॅटोस आर अशा दोन ई बाईक लाँच केल्यात... आकर्षक आणि उत्तम फिचर्समुळं या इलेक्ट्रिक बाईक्सवर ग्राहकांच्या उड्या पडल्या नसत्या तरच नवल. टॉर्क मोटर्सनं T1X नावानं रेसिंगमध्येही आपला दबदबा निर्माण केलाय. बाईक रेसिंगमध्ये उतरलेली आशियातली ही पहिलीच ईलेक्ट्रिक मोटारसायकल कंपनी ठरलीय.. २०१० च्या ग्रँडप्रीमध्ये पहिला क्रमांक पटकावून टॉर्क मोटर्स आणि कपिल शेळकेंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर यशपताका फडकावलीय... त्यासाठीच हा अनन्य सन्मान...

सुहास वायंगणकर - पर्यावरण क्षेत्र : सुहास मारुतीराव वायंगणकर... गेल्या २३ वर्षांपासून पर्यावरण आणि वन्य जीव क्षेत्रात कार्यरत कार्यकर्ते... एम. कॉम. इंडस्ट्रीयल मॅनेजमेंट शाखेत त्यांनी शिक्षण घेतलं. मात्र पर्यावरण रक्षणासाठी आयुष्य वेचलं... देशी वाण टिकावेत यासाठी मेहनत घेतली. पावसाळ्यापूर्वी सीड्स बॉल तयार करून डोंगरकपारीत रुजवले. दक्षिण पश्चिम घाटातील मोठ्या सस्तन प्राण्यांचा आणि गिधाडांचा अभ्यास केला. वातावरण बदल आणि वैश्विक तापमान वाढीबाबत जनजागृती मोहिमा राबवल्या. त्यासाठी कोल्हापूर ते तिरुपती असा ११११ किलोमीटरचा पायी प्रवास केला. पर्यावरणप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई संस्थेचे ते मार्गदर्शक... शाळा कॉलेजांमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्ग मंडळांची स्थापना झालीय. पर्यावरण रक्षणासाठी झटणा-या कार्यकर्त्याचा हा सन्मान...

प्रवीण व्यवहारे - क्रीडा क्षेत्र : वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे... मनमाडसारख्या ग्रामीण भागात १९९६ पासून ते वेटलिफ्टर्स घडवतायत... छत्रे विद्यालयात क्रीडा प्रशिक्षक म्हणून ते जॉईन झाले. शालेय जीवनातच खेळाडूंना वेटलिफ्टिंगचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी ते मेहनत घेतात. विशेषतः महिला वेटलिफ्टर्स घडवण्यात... जयभवानी व्यायामशाळेत ते खेळाडूंकडून खडतर सराव करून घेतात, खेळातले बारकावे शिकवतात. त्यांनी घडवलेल्या वेटलिफ्टर्सनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर 250 हून अधिक पदकांची कमाई केलीय. ऑस्ट्रेलियातल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी निकिता काळे... एशियन युथ चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक पटकावणारा मुकुंद आहेर... हे खेळाडू त्यांच्याच तालमीत घडले.. खेळाडू घडवण्याचा ध्यास घेतलेल्या या मेहनती प्रशिक्षकाचा हा अनन्य सन्मान...

शिवाजी अंबुलगेकर - शिक्षण क्षेत्र : धरीला पंढरीचा चोर गाण्याचं हे अहिराणी रूप... केवळ अहिराणीच नव्हे, तर बंजारा, पारधी, कैकाडी, म्हसनजोगी, दखनी मुसलमानी अशा विविध भाषांमध्ये नांदेडच्या विद्या निकेतन शाळेतली ही मुलं गाणी, कविता अनुवादित करतात... त्यांना ही कला शिकवली शिवाजी अंबुलगेकर सरांनी... एमएबीएड झालेल्या अंबुलगेकरांनी भटक्या विमुक्तांच्या बोलीभाषांचा शब्दकोश निर्माण केला. भूगोलाची आवड निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी माझ्या गावचा भूगोल हा प्रयोग राबवला. श्रावण अभिवाचन माला सुरू केली. लेखकांचा विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद घडवून आणला.. शिक्षण क्षेत्रात असे अनोखे प्रयोग राबवणा-या अंबुलगेकरांच्या धडपडीसाठी हा अनन्य सन्मान...

शांताबाई धांडे - कृषी क्षेत्र : सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर दुर्गम आदिवासी पाड्यात राहणा-या या शांताबाई खंडू धांडे... त्यांनी स्मार्ट शेतीचं दर्जेदार मॉडेल उभं केलंय. अहमदनगरच्या अकोले तालुक्यातल्या आंबेवंगण गावात... आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शांताबाईंनी भात शेतीतलं उत्पन्न दुप्पट करून दाखवलं. बायफ, कृषी विज्ञान केंद्र, इगतपुरीचं कृषी संशोधन केंद्र या संस्थांकडून त्यांनी चारसुत्री शेती, एसआरटी आणि एसआरआय या भात लागवड पद्धती शिकून घेतल्या. आधी स्वतःच्या शेतात हे प्रयोग यशस्वीपणे राबवले.... त्यांच्या परसबागेत औषधी वनस्पतींसह विविध प्रकारची फळझाडं आहेत. नानाविध गावठी भाज्यांचं विक्रमी उत्पादन त्या दरवर्षी घेतात. संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं त्या शेती करतात... हजारो शेतक-यांसाठी शाश्वत शेतीचं रोल मॉडेल बनलेल्या शांताबाईंचा हा अनन्य सन्मान...

पांडुरंग घोटकर - मनोरंजन क्षेत्र : ढोलकीवरची थाप असो....तबल्यावरचा ताल असो....नाही तर संबळाचा नाद असो....ही लोकवाद्यं वाजू लागली की एकच नाव समोर येतं... ढोलकीसम्राट पांडुरंग घोटकर... त्यांचं मूळ गाव औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातलं भिवधानोरा... वयाच्या दहाव्या वर्षी तमाशा स्पर्धेत त्यांनी ढोलकीवर अशी काही थाप मारली की, अख्ख्या महाराष्ट्राला नादावून टाकलं... तमाशा, संगीत बारीतलं त्यांचं ढोलकी-संबळवादन प्रेक्षकांना झपाटून टाकायचं. मुंबईतलं पिला हाऊस आणि न्यू हनुमान थिएटरमध्ये त्यांनी लावण्यांचे, तमाशांचे फड गाजवले. नामवंत लावणीसम्राज्ञी आणि ख्यातनाम गायिकांच्या ध्वनिमुद्रणात ढोलकीवादन केलं... अनेक वगनाट्यांतून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजनही केलं.. या अस्सल हरहुन्नरी लोककलावंताचा हा अनन्य सन्मान...

सतीश नाईक - कला क्षेत्र : सतीश नाईक... कलाकार, चित्रकार, पत्रकार असं बहुरंगी व्यक्तिमत्त्व... गिरगावात जन्मलेल्या नाईकांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून जी. डी. आर्टची पदवी घेतली. जेजेत शिकत असतानाच प्रायोगिक रंगमंच गाजवला. त्यांनी लिहिलेल्या एकांकिकेला नाट्यदर्पण पुरस्कार मिळाला. शेवटच्या वर्षात असताना पत्रकारिता सुरू केली. त्यांनी संपादित केलेल्या चिन्ह दिवाळी अंकाला पहिल्याच वर्षी पुरस्कार मिळाला. पण खूप मोठा आर्थिक फटका बसल्यानं पत्रकारिता सोडून पूर्णपणे पेंटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र ख्यातनाम चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या निधनाच्या बातमीची अवहेलना पाहून पुन्हा चिन्ह सुरू करायचं ठरवलं. अनेक नामांकित चित्रकारांवरचे त्यांचे विशेषांक गाजले. सध्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टवरील ग्रंथनिर्मितीत ते मग्न आहेत. चित्रकलेला वाहिलेली नवी वेबसाईट ते लवकरच सुरू करणार आहेत... चित्रकला हाच ऑक्सिजन मानणा-या कलाकाराचा हा अनन्य सन्मान...

रमाबाई आणि सखाराम तोरणे - सामाजिक कार्य : चिल्ल्यापिल्ल्यांची ही पंगत श्री संत गजानन महाराज आश्रमातली... सातारच्या दुष्काळी माण तालुक्यातल्या पानवन गावातली... रमाताई आणि सखाराम तोरणे गुरूजींनी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी निःस्वार्थीपणे सुरू केलेला हा आश्रम... आता तर हा आश्रम अनाथ, निराधार बालकांचा आधार बनलाय... पोतराज ते जिल्हा परिषद शाळा शिक्षक अशी झेप घेणा-या सखाराम गुरूजींनी आणि अनाथांची ताय बनलेल्या अंगणवाडी सेविका रमाबाईंनी पदरमोड करून ही संस्था जगवली... गुरुजींनी पेन्शन खर्ची घातली, रमाबाईंनी सौभाग्याचं लेणं असलेलं मंगळसूत्र विकलं... पण या शेकडो निराधार मुलांना कधीच काही कमी पडू दिलं नाही... शिक्षणाची गंगाच ऊसतोड कामगारांच्या मुलांचं भविष्य बदलू शकते, हे तोरणे दाम्पत्यानं ओळखलं आणि त्यासाठी आयुष्य वेचलं... त्यासाठीच हा अनन्य सन्मान....

विवेक तामायचीकर - शौर्य : कौमार्य चाचणी... भटक्या विमुक्त कंजारभाट समाजातली अनिष्ट प्रथा... जातपंचायतीच्या नावाखाली महिलांचं शोषण करणारी अमानवी परंपरा... पण सुशिक्षित तरुण पिढीनं या जाचक प्रथे विरोधात लढा पुकारलाय... त्यापैकीच एक नाव म्हणजे विवेक तामायचीकर... कायद्याचं शिक्षण घेतलेल्या आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विवेक यांचं लग्न १२ मे २०१८ साली झालं. मात्र कौमार्य चाचणी करणार नाही, असा ठाम पवित्रा विवेक आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या यांनी आधीच घेतला... त्यामुळं जात पंचायतीनं वाळीत टाकलं. त्यांची आजी वारली तेव्हा तिच्या अंत्यविधीला कुणीही जाऊ नये, असं फर्मान पंचायतीनं काढलं. गेल्यावर्षी विवेकचा लहान भाऊ धनंजय यानंही कौमार्य चाचणी न करता लग्न केलं. कंजारभाट समाजातल्या विकृतीविरुद्ध विवेकी वृत्तीनं लढा देणा-या तरुणाचा हा अनन्य सन्मान...