'पद्म पुरस्कारासाठी मी लायक नाही', असं का म्हणाले आनंद महिंद्रा

आनंद महिंद्राचा पद्म पुरस्काराने सन्मान 

Updated: Nov 10, 2021, 08:13 PM IST
'पद्म पुरस्कारासाठी मी लायक नाही', असं का म्हणाले आनंद महिंद्रा title=

मुंबई : महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांना यंदा पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांनी पद्म पुरस्कारांचे सोमवारी अनावरण केले. पद्म पुरस्कारा सारखा महत्वाचा आणि गौरवशाली सन्मान स्विकारण्यास आपण लायक नसल्याच आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे. त्यांनी केलेल्या ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे. 

आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'या सरकारने पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये बदल घडवून आणला आहे. आता प्रामुख्याने तळागाळातील समाजाच्या सुधारणेत मूलभूत योगदान देणाऱ्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले आहे. मला त्यांच्या श्रेणीत सामील होण्यासाठी खरोखर पात्र वाटले नाही. 

आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये तुलसी गौडा यांना पद्म पुरस्कार मिळाल्याचा फोटोही शेअर केला आहे. राष्ट्रपती कोविंद यांनी कर्नाटकातील पर्यावरणवादी तुलसी गौडा यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्री प्रदान केला आहे. त्यांनी 30,000 हून अधिक रोपे लावली आहेत आणि गेल्या सहा दशकांपासून पर्यावरण संरक्षण कार्यात त्यांचा सहभाग आहे.

अलिकडच्या वर्षांत, देशातील मोठ्या आणि नामांकित व्यक्तींशिवाय, भूमीशी संबंधित अत्यंत सामान्य लोकांनाही पद्म पुरस्कार मिळाले आहेत. यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत एकीकडे जॉर्ज फर्नांडिस, अरुण जेटली, सुषमा स्वराज, कंगना राणौत, एम.सी. मेरी कोम, आनंद महिंद्रा, पीव्ही सिंधू यांसारख्या प्रतिष्ठित व्यक्ती होत्या. तर दुसरीकडे संत्रा विक्रेते हरेकला हजबा, सायकल मेकॅनिक मोहम्मद शरीफ, अब्दुल जब्बार खान, लीला जोशो, तुलसी गौडा, राहीबाई सोमा पोपरे यांसारख्या सामान्य व्यक्तींचाही यात सहभाग होता.