मुंबईतील प्रभागांची संख्या वाढली, मुंबई मनपात आता 'इतके' नगरसेवक

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयावर भाजपाची टीका

Updated: Nov 10, 2021, 07:06 PM IST
मुंबईतील प्रभागांची संख्या वाढली, मुंबई मनपात आता 'इतके' नगरसेवक title=

मुंबई : पुढच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक  (BMC Election 2022) होणार आहे. त्याआधी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेत (BMC) आता नगरसवेकांच्या संख्येत वाढ होणार आहे. मुंबई मनपातील 9 प्रभाग वाढण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. त्यानुसार आता मुंबईतील प्रभागांची संख्या 227 वरुन 236 इतकी होणार आहे. 

2001 नंतर लोकसंख्येत झालेली वाढ, वाढलेलं नागरीकरण यामुळे नगरसेवकांच्या संख्येत वाढ करणे गरजेचे होतं,  वाढलेल्या मतदारांच्या संख्येनुसार प्रभाग संख्या वाढवली आहे अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 20 वर्षानंतर ही वाढ करण्याची आवश्यकता होती, त्यानुसार 9 प्रभाग वाढवले आहेत. आता 227 वरून 236 प्रभाग करण्यात आले आहेत.  मूलभूत सुविधा देण्यासाठी योग्य व्हावे म्हणून हा निर्णय घेतल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

प्रभाग फेररचनेचे काम अध्यादेश काढल्यानंतर सुरू होईल आणि  निवडणुकीच्या आधी ते पूर्ण होईल असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

प्रभाग वाढीवर भाजपाची टीका

मुंबई महापालिकेत प्रभाग वाढवण्याचा अध्यादेश राज्य सरकार काढणार, कारण शिवसेना घाबरलेली आहे, पण मुख्यमंत्री तुम्ही काहीही उद्योग करा, मुंबईत येणार तर भाजपच, असं भाजप नेते अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. प्रभागांची रचना मनासारखी होत नाही, निवडणूक आयोग ऐकत नाही, हे लक्षात आल्यानंतर आज तुम्ही हा निर्णय घेतलात, पण असं काहीही केलं तर भाजपचं मुंबईत येणार असा विश्वास अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला आहे. भ्रष्टाचाराचा आणि अकार्यक्षमतेचा हा राक्षस मुंबई महापालिकेत मुंबईकर जनता पाडल्याशिवाय राहणार नाही असंही अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

तर मुंबई महापालिकेत 9 नगरसेवक वाढवण्याचा निर्णय राजकीय फायद्यासाठी आणि तोंडावर आलेल्या निवडणूका पुढे ढकलण्यासाठी घेतल्याचा आरोप भाजप प्रवक्ता भालचंद्र शिरसाठ यांनी केला आहे.