मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा निवडणूक लढतील, असे परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. 'झी २४ तास'चे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांनी मुंडे यांची मुलाखत घेतली यावेळी त्यांनी हे स्पष्ट केले आहे. दरम्यान, नाराज असलेले अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे ते निवडणूक लढविणार नाहीत, अशी चर्चा होती. ते आपला मुलगा पार्थ याच्यासाठी सुरक्षित बारामती विधानसभा मतदार संघ सोडतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, धनंजय मुंडे यांनी या चर्चेवर यावर पडदा टाकला आहे.
आपल्यामुळे पवारांची बदनामी होऊ नये, या अस्वस्थतेतून आणि उद्विग्नतेतून तडकाफडकी राजीनामा दिल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. यावेळी अजित पवार भावूकही झाले. त्यांचा कंठ दाटून आला. भावूक झालेल्या पवारांना काही काळ बोलताही येईना. निवडणुकीबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ठरवतील, तेच मान्य करेन, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता अजित पवार शेती करणार नाही तर, तर राजकारणच करणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, शेतीबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी असं काही बोललो नाही. मात्र, मी खूप जवळून राजकारण पाहिले आहे. जे आता राजकारणात होत आहे, त्याबाबत न बोलले बरं. ज्यांचा कशाशी काहीही संबंध नाही, त्या पवारसाहेबांना यात गोवले गेले. याचे खूप वाईट वाटते. त्यामुळे मला काही सूचत नव्हते. मी कोणालाही न सांगता राजीनामा दिला, असे सांगताना ते म्हणाले, सकाळी सात वाजल्यापासून लोकांच्या भेटी घ्यायच्या. दिवसभर राबराबायचे, ते कोणासाठी? त्याचा काय फायदा होतो. त्यापेक्षा शेती बरी असे म्हटले.
तर त्याआधी राष्ट्रवादी नेते खासदार सुनील तटकरे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले होते. सगळं सुरळीत होईल. निवडणूक अजित पवारांच्या नेतृत्वाखाली लढणार असे वक्तव्य तटकरेंनी केले आहे. तटकरेंनी 'झी २४ तास' ला ही माहीती दिली. आता मुंडे यांनी स्पष्ट केल्याने अजित पवार हे निवडणूक लढविणार हे निश्चित मानले जात आहे. तसेच अजित पवार यांनीही पवारसाहेब जो आदेश देतील, त्याप्रमाणे होईल, असे संकेत दिले. त्यामुळे निवडणूक लढविणार की नाही, यावरचा पडदा उठला आहे.