मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय वर्षावर झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची मंगळवारी दुपारी वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीनंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
संपूर्ण राज ठाकरे प्रकरणावर मुख्यमंत्री कार्यालय लक्ष ठेवून होतं, अशी माहिती ही सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई कशी झाली, याबाबत नवीन माहिती हाती आली आहे.
तब्बल 5 तास पोलिसांनी राज ठाकरेंचं सुमारे ४५ मिनिटांचं भाषण ऐकलं. राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेत अटी आणि शर्तींचं उल्लंघन झालंय का, हे तपासण्यासाठी पोलीस उपायुक्त अपर्णा गितेंनी सायबर शाखेत तब्बल 5 वेळा काळजीपूर्वक हे भाषण ऐकलं. त्यानंतर त्यांनी गृह खात्याला अहवाल पाठवून दिला. त्यानंतर राज ठाकरेंवर कारवाईचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. भाषणातून चिथावणी मिळेल, गंभीर शांतताभंग होईल, दंग्यांसारखा अपराध घडेल हे माहीत असूनही बेछूट आणि चिथावणीखोर वक्तव्य केलं, असं या अहवालात म्हणण्यात आलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबादेतल्या सभेत चिथावणीखोर भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून अनेक कलमं लावण्यात आली आहेत. औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये राज ठाकरेंना आरोपी नंबर एक करण्यात आले आहे.