नववर्षात शिवसेनेत 'आदित्य पर्व', सोपवली जाणार मोठी जबाबदारी

मुंबईचा गड अभेद्य राखण्याचं आव्हान

Updated: Jan 3, 2022, 09:23 PM IST
नववर्षात शिवसेनेत 'आदित्य पर्व', सोपवली जाणार मोठी जबाबदारी title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) म्हणजे शिवसेनेचा (shivsena)प्राण. हा प्राण जपण्याची जबाबदारी आता असणार आहे, ती आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) महाविकास आघाडी सरकारचं (Mahavikas Aghadi Government) नेतृत्व करतायत. त्यांची तब्येत लक्षात घेता आगामी महापालिका निवडणुकांची (Mahapalik Election) जबाबदारी आदित्य ठाकरेंवर सोपवण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंचे राजकीय वारसदार म्हणून यानिमित्तानं आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होणार आहे.

याआधी युवा सेना प्रमुख म्हणून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं विद्यापीठ आणि पदवीधर मतदारसंघात चमकदार कामगिरी केली आहे. सध्या पर्यावरण, पर्यटन या खात्यांसोबतच मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्रीपदही ते सांभाळत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी शिवसेना नगरसेवक, आमदार, विभागप्रमुखांच्या बैठका घेऊन पालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद सांभाळण्यात व्यस्त असल्यानं निवडणूक व्यवस्थापन, रणनीती, उमेदवार निवड आणि प्रचाराची जबाबदारी देखील आदित्य ठाकरेच सांभाळणार असल्याचं समजतंय. उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्रीपद सांभाळताना आदित्यची मदत होत असल्याची कौतुकाची पावती स्वतः उद्धव ठाकरेंनी दिली होती.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत आपलं नेतृत्व यशस्वीपणे सिद्ध करून दाखवलं होतं. आता तीच वेळ आदित्य ठाकरेंवर आली आहे. 

एकीकडं मुंबईतली शिवसेनेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपनं सर्व शक्ती पणाला लावली आहे. मनसेसारखे कट्टर शिवसेना विरोधी पक्षही भाजपला मदत करत आहेत. अशावेळी मुंबईचा गड अभेद्य राखण्याचं मोठं आव्हान आदित्य ठाकरेंच्या शिरावर आहे.. हे आव्हान ते कसं पेलतात, यावर त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.