मुंबई : वादग्रस्त एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची डीआरआय विभागात बदली करण्यात आली. वानखेडे यांचा एनसीबीमधील कार्यकाळ आता संपलाय. मात्र, त्यांची बदली झाली असली तरी फर्जीवाडा करणाऱ्यांना लोकांसमोर आणणारच. त्यांच्याविरोधातील लढाई थांबणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.
समीर वानखेडे यांच्या बदलीचे वृत्त येऊन थडकताच मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी समीर वानखेडे यांच्या विरोधातील लढाई सुरूच राहील असं सांगितलं. समीर वानखेडे हे मनमानी आणि चुकीच्या पद्धतीने कारभार करत होते. मात्र, त्यांचा गाफीलपणाच त्यांना नडला.
एखाद्या अधिकाऱ्याने मर्यादेच्या पुढे जाऊन काम केलं की त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. वानखेडे यांना मुदतवाढ मिळावी यासाठी राज्यातील भाजपचे बडे नेते प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना मुदतवाढ मिळाली असती तर त्या भाजप नेत्यांनाही एक्सपोज केलं असतं, असे ते म्हणाले.
वानखेडे यांना मुदतवाढ मिळाली नाही हे चांगलं झालं. त्यांचा फर्जीवाडा उघड केला. त्यामुळेच त्यांना मुदतवाढ मिळाली नाही. या प्रकरणात सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.