जॅकलिन फर्नांडिसच्या इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, पाहा Video

जॅकलिनने काही महिन्यांपूर्वी वांद्र्यातील उच्चभ्रू ठिकाणी असलेल्या एका इमारतीत अलिशान घर खरेदी केले होते. आता त्याच इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

Updated: Mar 6, 2024, 11:00 PM IST
जॅकलिन फर्नांडिसच्या इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, पाहा Video  title=

Jacqueline Fernandez Building Fire : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अशी ओळख असलेली अभिनेत्री म्हणून जॅकलीन फर्नांडिसला ओळखले जाते. जॅकलिनने काही महिन्यांपूर्वी वांद्र्यातील उच्चभ्रू ठिकाणी असलेल्या एका इमारतीत अलिशान घर खरेदी केले होते. आता त्याच इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओही समोर आला आहे. 

नुकतंच इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जॅकलिन राहत असलेल्या इमारतीतील एका मजल्यावर भीषण आग लागल्याचे दिसत आहे. यात आग आणि धुराचे लोट पाहायला मिळत आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. तसेच ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

या व्हिडीओवर जॅकलिनच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिच्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे. यावर एकाने मी आशा करतो की या ठिकाणी राहणारे सर्वजण सुरक्षित असू दे, अशी कमेंट केली आहे. तर एकाने जॅकलिन सुरक्षित आहे का? असा प्रश्न विचारला आहे. 

दरम्यान जॅकलिनने काही महिन्यांपू्र्वी वांद्र्यातील याच इमारतीत आलिशान घर खरेदी केले होते. जॅकलिनचं नवं घर पाली हिलच्या नवरोज बिल्डिंगमध्ये आहे. या बिल्डिंगमधील सर्वांची घरं 1119 स्क्वेअर फूट ते 2557 स्क्वेअर फूट कार्पेट एरियादरम्यान असून हे सर्व फ्लॅट 3 बीएचके आणि 4 बीएचके अशा स्वरुपाचे आहेत. या अपार्टमेंटची किंमत 12 कोटी रुपयांपासून सुरू होते. शिवाय इथे क्लब हाऊस, स्विमिंग पूल व जिम अशा सुविधाही आहेत.

जॅकलिनचं नवं घर हे रणबीर कपूर, करीना कपूर यांच्या घराशेजारी आहे. तसेच जॅकलिनच्या घराच्या हाकेच्या अंतरावर सलमान खान व शाहरुख खानचंही घर आहे. तसेच जॅकलिन ही लवकरच अक्षय कुमारसोबत वेलकम टू जंगल या चित्रपटात झळकणार आहे. त्यासोबतच ती सध्या वैभव मिश्राच्या ‘फतेह’ चित्रपटाचे शूटींगही करत आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता सोनू सूद व विजय राज झळकणार आहेत. शिवाय जॅकलिन आदित्य दत्तच्या ‘क्रॅक जितेगा तो जिएगा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये जॅकलिनबरोबर विद्युत जामवाला व अर्जुन रामपाल हेही प्रमुख भूमिका निभावणार आहेत.