Acharya Marathe College: काही राज्यातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या कपडे परिधान करण्यावर बंधने आली होती. आता हे लोण मुंबईतल्या कॉलेजांमध्येही पसरल्याचे दिसतंय. मुंबईतील आचार्य मराठे कॉलेज वेगळ्या निर्णयामुळे चर्चेत आले आहे. या निर्णयावरुन त्यांच्यावर चहुबाजूने टिका होतेय. काय आहे हा निर्णय? सविस्तर जाणून घेऊया.
चेंबूर येथील एन.जी आचार्य मराठे कॉलेजने हिजाब, बुरखा, नकाब, टोपी यावर बंदी घातली होती. या निर्णयानंतर कॉलेजवर टीकेची झोड उठली होती. दरम्यान कॉलेज मॅनेजमेंटने आता आणखी एक नवीन फतवा जाहीर केलाय. त्यानुसार यापुढे कॉलेजमध्ये येताना जीन्स किवा टी शर्ट विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये घालून येता येणार नाहीत.
मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयात कॉलेजमध्ये बुरखा किवा हिजाब टोपी घालून येता येणार नाही असे म्हटले होते. त्याचाच आधार कॉलेज व्यवस्थापनाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार कॉलेजने 27 जून रोजी विद्यार्थ्यांसाठी नोटीस जारी केली. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी ड्रेस कोडचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी औपचारिक आणि सभ्य कपडे घालावेत असे विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या नोटिसमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे ज्या पोशाखातून धर्माचे प्रदर्शन होईल किवा सांस्कृतिक विषमता दाखवेल असे कपडे घालता येणार नाहीत, असे कॉलेजने स्पष्ट केले आहे. तसेच कॉलेज कॅम्पसमध्ये जीन्स टी शर्ट, उघड कपडे आणि जर्शी घालण्यास मज्जाव करण्यात आल्याचे नोटिसमध्ये म्हटले आहे.