'माझ्या मुलाला विश्वासघाताने संपवलं, बदनामी थांबवा...', वडील विनोद घोसाळकरांचं भावूक आवाहन

अभिषेक घोसाळकर यांची दहिसरमध्ये गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर अभिषेक घोसाळकरचे वडील आणि शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Feb 11, 2024, 07:43 PM IST
'माझ्या मुलाला विश्वासघाताने संपवलं, बदनामी थांबवा...', वडील विनोद घोसाळकरांचं भावूक आवाहन title=

मुंबई : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अभिषेक घोसाळकर यांची दहिसरमध्ये गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर आरोपी मॉरिस नोरोन्हाने स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर अभिषेक घोसाळकरचे वडील आणि शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विनोद घोसाळकर यांनी याबद्दल एक निवेदन जारी केले आहे.

माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने निर्घृण हत्या करण्यात आली. हा माझ्या कुटुंबावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी अश्लाघ्य आणि बिनबुडाचे आरोप करून माझी, माझ्या मुलाची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा हिडीस प्रकार सुरू आहे. असे खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी तत्काळ थांबवा, असे निवेदन शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी जारी केले आहे.

"कोणताही डाग आमच्यावर नाही"

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची बोरिवलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर घोसाळकर यांच्याबाबत आक्षेपार्ह बाबी पसरवल्या जात असून एका निवेदनाद्वारे अभिषेक यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी हा किळसवाणा प्रकार थांबवण्यासाठी बजावले आहे. 'मी १९८२ पासून सक्रिय राजकारणात आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के राजकारण आणि २० टक्के समाजकारण या सूत्राचे तंतोतंत पालन करत आहे. मी आणि माझा पुत्र अभिषेक आम्ही निरपेक्षपणे आणि निष्ठेने राजकारण आणि समाजकारण केले आहे. शिवरायांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. निष्कलंकपणे आम्ही सामाजिक जीवनात वावरत आहोत. कोणताही डाग आमच्यावर नाही. मी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलो. नंतर विधानसभेवर निवडून गेलो. मुलगा अभिषेक, सून तेजस्वी हेसुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आले. जनतेचे प्रेम आणि विश्वास आम्हाला मिळाला. त्याला आम्ही कधीही तडा जाऊ दिला नाही. जनतेची आम्ही नि:स्वार्थपणे सेवा केली, असे विनोद घोसाळकर म्हणाले.

"खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत"

माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने झालेली हत्या हा आमच्यावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी असे बिनबुडाचे आरोप करून आमचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार सुरू आहे. ही बदनामी कृपा करून तत्काळ थांबवा, अशी माझी कळकळीची विनंती आहे, असेही विनोद घोसाळकरांनी म्हटले.

आम्ही काही गुन्हा केला असेल आणि त्याचे पुरावे असतील तर खुशाल तक्रार नोंदवा. पण खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्यावर होत असलेले आरोप म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा किळसवाणा प्रकार आहे, अशा तीव्र भावना घोसाळकर यांनी निवेदनात व्यक्त केल्या आहेत.