मध्य रेल्वेवर धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना पट्ट्याने मारहाण, चाकूने भोसकून हत्या, VIDEO त सर्व कैद

मध्य रेल्वेवर (Central Railway) एका प्रवाशाची लोकलमध्ये चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेनमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार कैद केला असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: May 2, 2024, 08:51 PM IST
मध्य रेल्वेवर धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना पट्ट्याने मारहाण, चाकूने भोसकून हत्या, VIDEO त सर्व कैद title=

मध्य रेल्वेवर (Central Railway) एका प्रवाशाची लोकलमध्ये चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेनमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार कैद केला असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली असणारे तरुण लोकलमध्ये राडा करताना दिसत आहेत. वासींद आणि खडवली रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. दत्तात्रय भोईर असा हत्या झालेल्या प्रवाशाचं नाव आहे. ते शहापूरजवळील साजिवली गावात वास्तव्यास होते. प्रवाशांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. त्यांच्याविरोधात कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

27 एप्रिलला मध्य रेल्वेच्या वासींद आणि खडवली रेल्वे स्थानकादरम्यान हा प्रकार घडला आहे. या स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमध्ये काही तरुण चढले आणि त्यांनी प्रवाशांना मारहाण करत लुटण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांचे मोबाईल आणि सोन्याच्या चेन लुटण्याचा त्यांचा डाव होता. ते अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली होते. विरोध करणाऱ्यांना ते चाकूचा धाक दाखवत मारहाण करत होते. 

यावेळी दत्तात्रय भोईर यांनी त्या तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी पट्ट्यांनी त्यांना मारहाण केली. इतकंच नाही तर स्वतःजवळ असलेला चाकू काढून त्यांना भोसकलं. दत्तात्रय भोईर यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दत्तात्रय भोईर एका नातेवाईकाच्या हळदीसाठी उल्हासनगरला गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते कल्याणमधून कसारा लोकलने शहापूरला निघाले होते. त्याचवेळी वासिंद- खडवलीदरम्यान हा प्रकार घडला. 

दरम्यान या घटनेनंतर लोकल रेल्वेत एकच खळबळ उडाली होती. प्रवाशांनी या आरोपी तरुणांना पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. त्यांच्याविरोधात कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.