घरकाम करणाऱ्या आईला मुलाकडून 'सरप्राईझ बर्थडे गिफ्ट', घडवली हेलिकॉप्टरची सैर

अतिशय काबाडकष्ट करून मुलाला लहानाचं मोठं करणाऱ्या आईला तिच्या 50 व्या बर्थडेला अनोखं गिफ्ट मिळालं आहे.   

Updated: Aug 17, 2021, 11:19 PM IST
घरकाम करणाऱ्या आईला मुलाकडून 'सरप्राईझ बर्थडे गिफ्ट', घडवली हेलिकॉप्टरची सैर title=

चंद्रशेखर भूयार, झी 24 तास, उल्हासनगर :  अतिशय काबाडकष्ट करून मुलाला लहानाचं मोठं करणाऱ्या आईला तिच्या 50 व्या बर्थडेला अनोखं गिफ्ट मिळालं आहे. त्यामुळं आईचा आनंद गगनात मावेनासा झाला. प्रदीप गरड या मुलाने 50 व्या वाढदिवसानिमित्ताने आपल्या आईची इच्छापूर्ती केलीय. रेखा दिलीप गरड असं या आईचं नाव आहे.  रेखा गरड उल्हासनगरला राहतात. पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी लोकांची धुणीभांडी आणि घरकाम करुन आपल्या मुलांना काबाडकष्ट करुन त्यांना मोठं केलं. त्यांच्या या मेहनतीचं आता चीज झालंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. (A boy from Ulhasnagar took his mother on a helicopter ride for his 50th birthday)

प्रदीप बारावीला असताना एक दिवस त्यांच्या घरावरून हेलिकॉप्टर गेलं. त्यावेळी मला यात कधी बसायला मिळेल? असं रेखा सहज बोलून गेल्या. प्रदीपनं ती गोष्ट लक्षात ठेवली आणि आईच्या 50 व्या वाढदिवसाला तिची हेलिकॉप्टर राईडची हौस पूर्ण केली...

 
घरावरुन जाणारी विमानं आणि हेलिकॉप्टर पाहून त्यामधून एकदातरी प्रवास करावा, अशी प्रत्येक सर्वसामान्य घरातील व्यक्तीची इच्छा असते. पण विमानप्रवासाचा खर्च किंवा हेलिकॉप्टरचा प्रवास हा आपल्या खिशाला परवडणारा नसतो. रेखा यांच्या घरावरुनही अशीच विमान आणि हेलिकॉप्टर उडायची. तेव्हापासून त्यांना हेलिकॉप्टरमधून एकदातरी प्रवासा करावा, अशी इच्छा होती. पण तेव्हा ते शक्य नव्हतं. मात्र काही वर्षानंतर आपल्या आईची आईची हेलिकॉप्टरमधून फिरण्याची इच्छा प्रदीप भावाने पूर्ण केली.  प्रदीपने आपल्या आईला वाढदिवसाच्या निमित्ताने हेलिकॉप्टरची सैर घडवली.

वाढदिवसानिमित्त सिद्धिविनायक दर्शनाला जाऊया, असं सांगून प्रदीपनं आईला थेट जुहू एअरबेसवर नेलं... तिथं हेलकॉप्टर पाहून आईला आपले आनंदाश्रू आवरता आले नाहीत. ज्या आईनं हालअपेष्टा सोसून मुलाला स्वतःच्या पायावर उभं केलं, बोट धरून चालायला शिकवलं, त्याच मुलानं आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी आकाशाला गवसणी घातली..धन्य तो आधुनिक श्रावण बाळ... आणि धन्य ती माऊली.