अंकूर त्यागी, झी २४ तास, मुंबई : मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं (Mumbai Police Cyber Sale) एक मोठं सेक्स्टॉर्शन (Sextortion Racket) रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात 100च्या आसपास बॉलिवूड सेलिब्रेटी (Bollywood Celebrities) आणि टीव्ही स्टार्सना (TV Celebrities ) लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. कळस म्हणजे एकीकडे खंडणी उकळत असतानाच या सेलिब्रेटींचे न्यूड व्हीडिओ डार्क वेबवर विकण्यातही आले आहेत. (Mumbai Police Cyber Cell Destroys Large Sextortion Racket)
मुंबई पोलिसांनी सेक्स्टॉर्शनच्या आजवरच्या सर्वात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. नागपूर, ओडिशा, गुजरात आणि कोलकाता इथून 4 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून हाती आलेली माहिती फार धक्कादायक आहे. या टोळक्याकडे तब्बल 258 जणांचे न्यूड व्हीडिओ आढळले असून त्यांच्याकडून लाखोंची खंडणी उकळण्यात आलीये. धक्कादायक बाब म्हणजे यात 100 बॉलिवूड सेलिब्रेटीदेखील अडकले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोघे इंजिनियर आहेत. तर एक आरोपी अल्पवयीन आहे.
सगळ्यात आधी सोशल मीडियावरून बॉलिवूड स्टार आणि टीव्ही पर्सनालिटीसोबत जवळीक वाढवली जाते. एकदा सावज हेरल्यानंतर त्याची सगळी माहिती गोळा केली जाते. 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ सोशल मीडियावरून मैत्री वाढवली जाते. मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं की शिकार टप्प्प्यात येतं.
मग न्यूड व्हिडिओ कॉल करायला सांगितले जातात. हे व्हिडिओ रेकॉर्ड होतात. त्यानंतर सुरु होतो तो खंडणीचा खेळ. वारंवार लाखो रुपयांची खंडणी उकळली जाते. धक्कादायक म्हणजे एकीकडे खंडणी उकळत असताना डार्क वेबवर सेलिब्रिटींचे न्यूड व्हिडिओ विकलेही जात होते. त्यामुळे सोशल मीडियावर मैत्री करताना अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे.
खंडणीची रक्कम नेपाळमधील एका बँक खात्यात जमा होत होती. नेपाळ सरकारला बँकेचे डिटेल्स देण्याची विनंती पोलिसांनी केलीये. ही माहिती हाती आल्यानंतर सेक्स्टॉर्शनच्या विळख्यात बॉलिवूडमधल्या कोणते चेहरे अडकले आहेत याचा पर्दाफाश होणार.